अंतत: ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात होणार राष्ट्रव्यापी कायदा !

लव्ह जिहादचे नाव न घेता कायद्यामध्ये ‘ओळख लपवून केलेला विवाह गुन्हा असेल’, असा उल्लेख; किमान १० वर्षांची होणार शिक्षा !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

नवी देहली – ब्रिटीशकालीन कायदे रहित केले जाणार असून त्यांच्याऐवजी जनतेला दंडित करणारे नव्हे, तर न्याय देणारे कायदे आणण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ११ ऑगस्ट या दिवशी लोकसभेत दिली. यानुषंगाने मुली आणि महिला यांच्यावरील अत्याचारांच्या संदर्भात अत्यंत कठोर कायदे बनवण्यात येण्याचे सुतोवाचही शहा यांनी केले आहे. स्वत:ची ओळख म्हणजेच धर्म लपवून कुणा महिलेशी विवाह केल्याच्या दोषी पुरुषाला कठोर शिक्षा केली जाईल, असेही शहा म्हणाले.

१. सध्या लव्ह जिहादने देशभरात थैमान घातले आहे. या दृष्टीने केंद्रशासन आणत असलेल्या या कायद्यामुळे लव्ह जिहादवर आळा बसण्यास साहाय्य होईल, असे सांगितले जात आहे. यामध्ये स्वत:ची ओळख लपवून नोकरी अथवा पदोन्नती देण्याच्या नावाखाली विवाह केल्यास त्यावरही शिक्षेचे प्रावधान असणार आहे.

२. सध्या कुणा महिलेशी विवाह करण्याचे कारण देत लैंगिक संबंध प्रस्थापित करणार्‍याला बलात्काराचा गुन्हा म्हणता येत नाही; परंतु नव्या कायद्यामध्ये यावर प्रावधान असेल. यामध्ये किमान १० वर्षांच्या शिक्षेसह दंडही ठोठावला जाईल.

३. ‘भारतीय दंड विधान, १८६०’च्या ऐवजी येणार असलेले ‘भारतीय न्याय संहिता २०२३’मध्ये महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात कायदे असणार आहेत.

महिलांवरील अत्याचारांवर एवढी होणार शिक्षा !

  • बलात्कार : बलात्कार्‍याला किमान १० वर्षांच्या कारावासापासून आजीवन कारावासाची शिक्षा !
  • सामूहिक बलात्कार : सामूहिक बलात्काराच्या प्रकरणी किमान २० वर्षांची शिक्षा
  • बलात्कारानंतर महिलेचा मृत्यू : बलात्कारानंतर महिलेचा मृत्यू झाला अथवा ती पुष्कळ वेळ बेशुद्धावस्थेत राहिली, तर दोषीला २० वर्षांच्या शिक्षेपासून आजीवन कारावास आणि प्रसंगी फाशीची शिक्षा !
  • १२ वर्षांपेक्षा अल्प मुलीवर बलात्कार : हाच नियम १२ वर्षे वयापेक्षा लहान असलेल्या मुलीवर बलात्कार केल्यास असणार !

संपादकीय भूमिका

  • लव्ह जिहादसारख्या हिंदूंच्या मुळावर उठलेल्या षड्यंत्राच्या विरोधात केंद्रशासनाने घेतलेला हा निर्णय स्तुत्य आहे !
  • उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश यांसारख्या भाजपशासित राज्यांनी ज्याप्रकारे ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ असे नाव देऊन कायदे बनवले, त्या धर्तीवरच केंद्रशासनानेही करावे, अशी हिंदूंना अपेक्षा आहे. केवळ यानेच ‘लव्ह जिहाद’चे कुकृत्य करणारे आणि त्याला थोतांड म्हणणारे या सर्वांवर चाप बसण्यास साहाय्य होईल !
  • ‘सनातन प्रभात’ गेली किमान १५ वर्षे लव्ह जिहादच्या विरोधात वाचा फोडत आले आहे. गेल्या काही मासांपासून यासंबंधीच्या घटनांवर प्रतिदिन सरासरी २ बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत. हा कायदा एकप्रकारे ‘सनातन प्रभात’ची समाजहितैषी पत्रकारिता आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रयत्न यांचे फलितच होय, असे म्हणायला हरकत नाही !