भारतविरोधी धोरणांत काँग्रेसचा सहभाग : चीनकडून अर्थपुरवठा ! – भाजप

चीनकडून अर्थपुरवठा होणार्‍या ‘न्यूज क्लिक’ वृत्तसंकेतस्थळाला काँग्रेसचा पाठिंबा !

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

नवी देहली – काँग्रेस आणि चीन या एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत. ‘न्यूज क्लिक’ या वृत्तसंकेतस्थळाच्या माध्यमातून चीन भारतात साम्यवादी पक्षाचे धोरण रेटत असून या वृत्तसंकेतस्थळाला काँग्रेस पाठीशी घालत आहेत. त्यामुळे भारतविरोधी धोरणांत काँग्रेसचा सहभाग आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी येथे एका पत्रकार परिषदेत केला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे ‘प्रेमाचे दुकान’ चिनी मालाने भरले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘द्वेेषाचे दुकान’ आहे, तर काँग्रेसचे ‘प्रेमाचे दुकान’ आहे’, असे विधान केले होते.
विरोधी पक्षांनी नव्याने स्थापन केलेल्या ‘इंडिया’ या आघाडीवर टीका करतांना ठाकूर म्हणाले की, या आघाडीचे नेते आणि समर्थक हेही देशहिताचा विचार करू शकत नाही. या आघाडीत ‘भारत कसा दुबळा होईल?’, ‘भारतला कशी हानी पोचवायची ?’, ‘भारतविरोधी धोरणाला कसे खतपाणी घालायचे ?’ या गोष्टींची चिंता असणार्‍या लोकांचा भरणा आहे.

सौजन्य: Aaj Tak

‘न्यूज क्लिक’ या वृत्तसंकेतस्थळाला चीनमधील ‘ग्लोबल मीडिया संस्थान’कडून अर्थपुरवठा केला जातो. यंत्रणांनी या संकेतस्थळाच्या कार्यालयावर घातलेल्या धाडीत नेविल राय सिंघम याने हा अर्थपुरवठा केल्याचे उघड झाले. त्याचा संबंध चीनमधील सत्ताधारी ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’च्या भारतविरोधी काम करणार्‍या शाखेशी असल्याचे उघड झाले. ही शाखा ‘भारत तोडा’ ही मोहीम राबवते. या सिंघम याला चिनी आस्थापने अर्थपुरवठा करतात. या वृत्तसंकेतस्थळाच्या माध्यमातून बातम्यांच्या नावाखाली चीनची भारतविरोधी धोरणे रेटली जात होती आणि काँग्रेस, तसेच अन्य काही पक्ष त्याचे ‘भाषणस्वातंत्र्या’च्या नावाखाली या वृत्तसंकेस्थळाचे समर्थन करत होते.