गोव्यात ४ वर्षांत ‘धार्मिक तंटे, भांडणे आणि दंगली’ यांवरून १५ गुन्हे नोंद

पणजी, ६ ऑगस्ट (वार्ता.) – गोव्यात वर्ष २०१९ ते २०२३ या कालावधीत ‘धार्मिक तंटे, भांडणे आणि दंगली’ या विषयांवरून एकूण १५ ‘प्रथमदर्शनी अहवाल’ (एफ्.आय्.आर्) नोंद झालेले आहेत. समस्त हिंदूंचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा चिखली (गोवा) येथील पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांनी चर्चमधील प्रार्थनेत अवमान केल्याने त्यांच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल नोंद झालेला आहे. पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांच्या विरोधात प्रविष्ट झालेला गुन्हा, ही या सूचीतील सर्वांत ताजी घटना आहे.

पोलिसांकडील माहितीनुसार ‘धार्मिक तंटे, भांडणे आणि दंगली’ या विषयावरून वर्ष २०१९ मध्ये १, वर्ष २०२० मध्ये ४, वर्ष २०२१ मध्ये सर्वाधिक म्हणजे ५, वर्ष २०२२ मध्ये ३ आणि चालू वर्षात आतापर्यंत २ प्रकरणांची नोंद झालेली आहे. यामधील एकूण ९ प्रकरणांमध्ये न्यायालयात खटला चालू आहे, ४ प्रकरणांचे अन्वेषण चालू आहे, तर २ प्रकरणांमध्ये पोलिसांनी अहवाल न्यायलयात सुपुर्द केलेला आहे. कुडचडे-सावर्डे येथे वर्ष २००६ मध्ये झालेल्या दंगलीनंतर गोव्यात ‘सिटीझन्स इनिशिएटीव्ह फॉर कम्युनल हार्मनी’ या सत्य शोधक समितीची स्थापना केलेली आहे, तसेच जिल्हाधिकारी गोव्यात सातत्याने ‘कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणे’ यांसंबंधी आदेश काढत असतात.

पाद्री बोलमॅक्‍स पेरेरा

पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

चिखली (गोवा) येथील पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांनी चर्चमधील प्रार्थनेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे विधान केल्याच्या प्रकरणी त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेचे कलम २९५ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यानंतर पाद्री पेरेरा यांनी मडगाव जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे. या अर्जावर ७ ऑगस्ट या दिवशी सुनावणी होणार आहे. पाद्री पेरेरा यांच्या वतीने अधिवक्ता ए. आंद्राद युक्तीवाद करणार आहेत.

गोव्याबाहेरील मुसलमानांची गोव्यातील अनियंत्रित लोकसंख्या ही एक धोक्याची घंटा !

गोव्याबाहेरील मुसलमानांची गोव्यात लोकसंख्या वाढत आहे. गोव्याबाहेरील मुसलमान कामगार बंगाल, बिहार आणि कर्नाटक या राज्यांतून झुंडीने येत आहेत. यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी अनधिकृत झोपडपट्ट्यांची संख्याही वाढत आहे. सत्तरी येथील खोतोडे पंचायत क्षेत्रातील एक मोठी चाळ, सत्तरी येथील पोडोशे गावातील एक वसाहत, पणजी येथील अटल सेतूचा एक भाग फोंड्याच्या रस्त्याला जाऊन मिळतो तेथे डाव्या बाजूने शेतातील एक मोठी चाळ आदी अनेक अनधिकृत चाळी निर्माण झालेल्या आहेत. (ही अनधिकृत झोपडपट्टी प्रशासनाला दिसत नाही का ? आसाम, उत्तरप्रदेश येथील सरकारांप्रमाणे गोव्यातही या बांधकामांवर बुलडोझर फिरवायला हवा ! – संपादक) यामुळे गोव्यात ‘मिनी पाकिस्तान’ निर्माण होण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. लोकप्रतिनिधी एकगठ्ठा मतांसाठी या लोकवस्तींकडे दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप होत आहे. सरकार आणि शासन यांनी वेळीच या अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण न आणल्यास भविष्यात स्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

संपादकीय भूमिका

शांततापूर्ण गोव्यात धार्मिक तंट्यांमध्ये वाढ होणे चिंताजनक !