‘डेटिंग अ‍ॅप्‍स’वर बंदी हवी !

संपादकीय

‘ऑनलाईन डेटिंग अ‍ॅप’ रॅकेट !

कोलकाता शहरात ‘डेटिंग सर्व्‍हिस’ देणार्‍या एका कार्यालयावर पोलिसांनी धाड टाकून १० तरुणींसह १६ जणांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी संकेतस्‍थळावरून अनेक तरुणींची छायाचित्रे लोकांना पाठवत आणि नंतर त्‍यांची फसवणूक करून त्‍यांच्‍याकडून ५ ते १५ सहस्र रुपयांपर्यंत पैसे वसूल करत. ही केवळ उघड झालेली प्रातिनिधिक घटना असून अनेक जण ‘नाव समोर आल्‍याने अपकीर्ती होईल’, या भीतीपोटी तक्रारच प्रविष्‍ट करत नाहीत. गेल्‍या काही वर्षांपासून ‘ऑनलाईन डेटिंग अ‍ॅप’ नावाचा प्रकार प्रचंड वाढला असून कोट्यवधी लोक याचा वापर करतात. अनेक जण ‘यातून आपल्‍याला चांगला जोडीदार मिळेल’, या अपेक्षेने या अ‍ॅपच्‍या आहारी जातात. बहुतांश जणांना लक्षावधी रुपयांची फसवणूक झाल्‍यानंतरच त्‍यात अडकल्‍याचे लक्षात येते. या ‘अ‍ॅप’च्‍या माध्‍यमातून शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा सर्वच प्रकारची फसवणूक होत असल्‍याचे अनेक प्रकार सध्‍या उघडकीस येत आहेत. दुर्दैवाने ‘गूगल प्‍ले स्‍टोअर’वर सध्‍या सहस्रो ‘ऑनलाईन डेटिंग अ‍ॅप’ उपलब्‍ध असून सध्‍या तरी याला आळा घालता येईल, असा कोणताही सक्षम कायदा भारतात उपलब्‍ध नाही.

‘डेटिंग अ‍ॅप’ची विकृती !

सध्‍याची तरुण पिढी घंटोन्‌घंटे भ्रमणभाष हाताळत असते. यातून एकाकीपणाची भावना वाढते. नेमके हेच हेरून प्रारंभी परदेशात ‘डेटिंग अ‍ॅप’च्‍या विकृतीला प्रारंभ झाला. हे ‘अ‍ॅप’ म्‍हणजे अशा प्रकारची व्‍यवस्‍था असते की, ज्‍यावर तुम्‍ही तुमची माहिती देऊन तुम्‍हाला अपेक्षित असा जोडीदार शोधू शकता किंवा त्‍याच्‍याशी मैत्री करू शकता. ‘आज हा जोडीदार, तर उद्या तो जोडीदार, आज हा मित्र, तर उद्या तो मित्र’, अशी संकल्‍पना भारतीय संस्‍कृतीत नाही; मात्र ‘डेटिंग अ‍ॅप’च्‍या माध्‍यमातून केवळ युवकांनाच नाही, तर प्रौढ लोकांनाही आता याची भुरळ पडली असून ते या षड्‌यंत्रात अडकत आहेत.

‘श्रद्धा वालकर’ची हत्या तिच्या ३ वर्षांच्या साथीदाराने केली होती. ते एका डेटिंग ॲपवर भेटले होते आणि तिला मारल्यानंतर आफताबने दुसरा ‘मॅच’ शोधण्यासाठी त्याच ॲपवर शोध घेतला !

अनेक जण अशा संकेतस्‍थळांवर जाऊन आवडता मित्र-जोडीदार शोधण्‍याचा प्रयत्न करतात; मात्र यांतील बहुतांश ‘प्रोफाईल’ (व्‍यक्‍तीची पूर्ण माहिती) खोटेच असतात. अशा ‘अ‍ॅप’च्‍या माध्‍यमातून अपलाभ उठवणारे नेहमी ‘सावजा’च्‍या शोधात असतात. अनेक जण त्‍यांची सगळी माहिती अशा ‘अ‍ॅप’वर पाठवतात, ज्‍याचा पुढे विविध कारणांसाठी दुरुपयोगही होतो. मध्‍यंतरी उत्तरप्रदेश पोलिसांनी नोएडा येथून विविध ‘डेटिंग अ‍ॅप’च्‍या माध्‍यमातून तरुणींची फसवणूक करणारी एक आंतरराष्‍ट्रीय टोळी पकडली. यात ३०० पेक्षा अधिक तरुणींची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली होती. पकडण्‍यात आलेल्‍या टोळीत ५ नायजेरियन युवक आणि भूतान येथील एका युवतीचा समावेश होता. ही टोळी डॉक्‍टर, अभियंता, उद्योगपती, शल्‍यविशारद यांसह उच्‍चपदस्‍थ असल्‍याचे अनेक खोटे प्रोफाईल बनवत. यानंतर केवळ भारतीयच नव्‍हे, तर पोर्तुगाल, स्‍विडन, नेदरलँडस् यांसह विदेशांतील तरुणींशी मैत्री करत. प्रारंभी त्‍या तरुणींना महाग भेटवस्‍तू पाठवत. यानंतर त्‍यांना भारतात बोलावत. तिथे खोटे कस्‍टम अधिकारी बनून भेट देणार्‍या तरुण-तरुणींनाच धमकी देऊन त्‍यांच्‍याकडून पैसे काढून घेत. अन्‍य एका प्रकरणात एका महिला वैमानिकाची ‘डेटिंग अ‍ॅप’च्‍या माध्‍यमातून अन्‍य एका वैमानिकाशी ओळख झाली. पुढे हा वैमानिक तिच्‍या घरी आला आणि ती त्‍याच्‍या अत्‍याचाराला बळी पडली. इतकी मोठी फसवणूक झाल्‍यावर ‘त्‍याने दिलेली माहिती खोटी होती’, हे तिच्‍या लक्षात आले. यावरून असे लक्षात येते की, अनेक महिला-युवती ‘डेटिंग अ‍ॅप’वर असलेल्‍या माहितीवर विश्‍वास ठेवतात. ‘माझी फसवणूक झाली आहे’, हे जेव्‍हा त्‍यांच्‍या लक्षात येते, तेव्‍हा वेळ गेलेली असते.

डेटिंग ॲप ! आर्थिक लूट !!!

विवाह जुळवून देणार्‍या खोट्या ‘वेबसाईट’ आणि ‘अ‍ॅप’ !

ज्‍याप्रकारे खोटी माहिती देऊन फसवणूक करणारे ‘डेटिंग अ‍ॅप्‍स’ आहेत, अगदी त्‍याचप्रमाणे विवाह जुळवून देण्‍याच्‍या नावाखाली खोटी माहिती देऊन मोठी फसवणूक करणार्‍या ‘वेबसाईट’ आणि अन्‍य ‘अ‍ॅप्‍स’ही कार्यरत आहेत. आजकाल अनेक नामांकित संस्‍थांनी विवाह जुळवून देणारी ‘वेबसाईट’ आणि ‘अ‍ॅप’ चालू केले आहेत; मात्र याचाही अपलाभ उठवून पैसे लुटणार्‍यांची एक मोठी टोळी कार्यरत आहे. अशा संकेतस्‍थळांच्‍या माध्‍यमातून येणारी स्‍थळे ते परदेशात रहात असल्‍याचे सांगतात. यानंतर या टोळीतील लोक भारतातील तरुणींना काही महागड्या वस्‍तू पाठवतात आणि त्‍यांचा विश्‍वास संपादन करतात. एक दिवस त्‍या टोळीतील व्‍यक्‍ती ‘मी अत्‍यंत महागडी भेटवस्‍तू घेऊन भारतात येत आहे’, असे सांगून विमानतळावर भेटण्‍यासाठी बोलावतात. विमानतळावर पोचल्‍यावर ‘मला ‘कस्‍टम’ अधिकार्‍यांनी पकडले असून त्‍यासाठी इतक्‍या पैशांची आवश्‍यकता आहे’, असे सांगून महिला अथवा पुरुष यांच्‍याकडून लाखो रुपये वसूल करतात.

‘डेटिंग अ‍ॅप’मुळे भारतात विवाहबाह्य संबंधांमध्‍ये वाढ होत असून अशा प्रकारचे ‘अ‍ॅप’ म्‍हणजे भारतीय संस्‍कृतीवरील मोठे आक्रमणच आहे. यांतील अनेक ‘अ‍ॅप्‍स’ हे परदेशातून चालवले जातात आणि त्‍याद्वारे गुन्‍हेगारी, नीतीमत्तेचे हनन अन् अनेक वाईट गोष्‍टींना चालनाच मिळते. यांतील अनेक ‘अ‍ॅप्‍स’च्‍या सदस्‍य नोंदणीसाठी आणि पुढील लाभ मिळवण्‍यासाठी पैसे आकारतात. यातून भारतीय आर्थिक चलनाची लूटही होते. अशा प्रकारच्‍या ‘अ‍ॅप्‍स’वर युवक-युवती घंटोन्‌घंटे एकमेकांशी बोलण्‍यात अमूल्‍य वेळही वाया घालवतात आणि पैसाही.

भारतातील युवा पिढी हे भारताचे भविष्‍य आहे. अशा ‘अ‍ॅप्‍स’द्वारे त्‍यांचे आयुष्‍य उद़्‍ध्‍वस्‍त होणे, हे भारताच्‍या उत्‍कर्षासाठी घातक आहे.  ज्‍याप्रमाणे भारत शासनाने ‘पबजी’सारख्‍या खेळावर बंदी घालून त्‍या माध्‍यमातून आहारी जाणारे अनेक विद्यार्थी आणि नागरिक यांना वाचवले, त्‍याच प्रकारे भारत शासनाने ‘डेटिंग अ‍ॅप्‍स’वर बंदी आणणे अत्‍यावश्‍यक आहे. असे झाले, तरच या माध्‍यमातून होणारी फसवणूक आणि अनैतिकतेकडे झुकणार्‍या काही गोष्‍टींना तरी आळा बसू शकेल ! राष्‍ट्रप्रेमी नागरिकांनीही विविध माध्‍यमांद्वारे अशा ‘अ‍ॅप्‍सवर’ बंदीची मागणी लावून धरायला हवी.

भारतीय संस्‍कृतीवर घाला घालणार्‍या ‘डेटिंग अ‍ॅप’सारख्‍या सामाजिक माध्‍यमांवर बंदी आवश्‍यक !