लोकमान्‍य टिळक : एक अलौकिक हिंदु नेते !

आज १ ऑगस्‍ट २०२३ ! लोकमान्‍य टिळक यांच्‍या पुण्‍यतिथीनिमित्त त्‍यांच्‍या स्‍मृतींना विनम्र अभिवादन !

१. लोकमान्‍य टिळक यांचा स्‍वातंत्र्यलढ्यात सक्रीय सहभाग !

ब्रिटिशांनी हिंदुस्‍थानवर राजकीय सत्ता प्रस्‍थापित केली. ही सत्ता उलथवण्‍यासाठी १८५७ चे पहिले स्‍वातंत्र्ययुद्ध लढले गेले. या युद्धात यश मिळाले नसले, तरी ब्रिटीश सत्तेला मात्र हादरा बसला होता. त्‍यानंतर वासुदेव बळवंत फडके यांनी महार, मांग, रामोशी अशा विविध जातींतील लोकांना एकत्र घेऊन ब्रिटीश सत्तेविरुद्ध सशस्‍त्र लढा दिला. त्‍यात त्‍यांना यश आले नाही; पण तरीही ब्रिटीश सत्ता पुन्‍हा एकदा हादरली. या ऐतिहासिक पार्श्‍वभूमीवर लोकमान्‍य टिळक यांनी देशाच्‍या स्‍वातंत्र्यलढ्यात सक्रीय सहभाग घेतला.

श्री. दुर्गेश परुळकर

अ. ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या दोन वृत्तपत्रांमधून त्‍यांनी देशात स्‍वातंत्र्यलढा उभारला. ब्रिटीश सत्तेला धारेवर धरले. सशस्‍त्र क्रांतीकारकांना प्रेरणा दिली. त्‍यांच्‍या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले.

आ. ‘देश स्‍वतंत्र असेल आणि आपलीच राजकीय सत्ता असेल, तर धर्म आणि संस्‍कृती टिकून रहाते’, हा विचार लोकांच्‍या मनावर बिंबवण्‍यासाठी लोकमान्‍य टिळक यांनी ‘सार्वजनिक गणेशोत्‍सव’ आरंभला आणि त्‍याला शिवजयंतीची जोड दिली.

इ. ‘छत्रपती शिवरायांनी घेतलेली हिंदवी स्‍वराज्‍य स्‍थापनेची शपथ आणि त्‍यांनी निर्माण केलेले हिंदवी स्‍वराज्‍य आपल्‍या बांधवांच्‍या स्‍मृतीतून नष्‍ट होऊ नये, तसेच शिवरायांना समोर ठेवून आपल्‍या बांधवांनी देश स्‍वतंत्र करण्‍यासाठी लढा द्यावा’, हा हेतू मनात धरून हे दोन्‍ही उत्‍सव साजरे करण्‍याचा प्रयत्न लोकमान्‍य टिळक यांनी केला.

ई. सार्वजनिक गणेशोत्‍सवातून त्‍यांनी धार्मिक आणि सांस्‍कृतिक भावना जोपासली, तर शिवजयंती उत्‍सवाच्‍या निमित्ताने हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेचे उद्दिष्‍ट आपल्‍या बांधवांसमोर ठेवले.

२. तरुणांना सैन्‍यात भरती होण्‍याचे आवाहन !

वर्ष १९१४ मध्‍ये पहिल्‍या महायुद्धाला तोंड फुटले. ब्रिटीश सरकारला सैनिकांची आवश्‍यकता होती. सरकारने हिंदुस्‍थानच्‍या नागरिकांना सैन्‍यात सहभागी होण्‍याचे आवाहन केले. जनतेला ब्रिटीश सरकारचे हे आवाहन विचित्र वाटले. या आवाहनाला प्रतिसाद देतांना लोकमान्‍य टिळक म्‍हणाले, ‘‘ब्रिटीश सरकार ६ सहस्र सैनिकांची मागणी करत आहे. वेळ पडली, तर मी माझ्‍या देशातून ६ लाख सैनिक नव्‍हे, त्‍याहीपेक्षा अधिक सैनिक तुम्‍हाला सहज पुरवू शकेन.’’ इंग्‍लंडचे तत्‍कालीन पंतप्रधान लॉइड जॉर्ज यांनी दिलेल्‍या आदेशानुसार व्‍हाईसरॉय चेल्‍म्‍सफोर्ड यांनी हिंदुस्‍थानच्‍या जनतेला विश्‍वासात घेऊन हे आवाहन केले होते. या आवाहनाला टिळकांनी दिलेल्‍या प्रतिसादामागचा हेतू चेल्‍म्‍सफोर्ड यांनी ओळखला होता. टिळकांनी मात्र संपूर्ण देशभर दौरा केला आणि तरुणांना सैन्‍यात भरती होण्‍याचे आवाहन केले.

३. तरुणांना सैन्‍य भरतीसाठी प्रोत्‍साहन देणारे लोकमान्‍य टिळक !

मुंबईत सैनिकीकरणावर भाषण देतांना लोकमान्‍य टिळक म्‍हणाले, ‘‘जर माझे पांढरे झालेले केस आणि माझे वाढलेले वय या गोष्‍टी सैन्‍यात शिरण्‍याच्‍या आड येत नसतील, तर सैन्‍यात शिरून माझा वाटा उचलण्‍याची माझी सिद्धता आहे.’’ लोकमान्‍य टिळकांच्‍या या एका वाक्‍याने देशातील तरुणांमध्‍ये उत्‍साह संचारला. दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी परत आलेल्‍या अनुमाने ८५० तरुणांनी सैन्‍यात भरती होण्‍याची सिद्धता त्‍याच सभेत दाखवली. टिळकांच्‍या या धोरणाला त्‍या वेळच्‍या अनेक नेत्‍यांनी विरोध केला; पण त्‍या विरोधाला बाजूला सारून लोकमान्‍य टिळक यांनी देशातील तरुणांना सैन्‍यात भरती होण्‍यासाठी प्रोत्‍साहन दिले.

४. स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍याकडूनही हिंदु तरुणांना सैन्‍य भरतीसाठी प्रोत्‍साहन !

दुसर्‍या महायुद्धाच्‍या वेळी स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशातील हिंदु तरुणांना सैन्‍यात भरती होण्‍यासाठी आवाहन केले होते. त्‍या वेळी सावरकर यांनाही विरोध करण्‍यात आला होता; पण त्‍याकडे दुर्लक्ष करून सावरकर यांनी देशातील हिंदु तरुणांना सैन्‍यात भरती होण्‍यासाठी असेच प्रोत्‍साहन दिले होते.

५. टीकाकार व्‍हॅलेंटाईन चिरोलने केलेले लोकमान्‍य टिळकांचे कौतुक

टिळकांवर अनेकांनी टीका केली. व्‍हॅलेंटाईन चिरोलने तर टिळकांची अपकीर्ती करणारा ग्रंथच लिहिला; म्‍हणून टिळकांनी त्‍याच्‍यावर खटला भरला. या खटल्‍यात टिळकांचा पराभव झाला. चिरोलने खटला जिंकल्‍यावर एका मुलाखतीत म्‍हटले, ‘‘मी वर्तमानपत्रात लिहिण्‍याचा धंदा अनेक वर्षे करत आहे. मला या अवधीत अडवून किंवा खडसावून जाब विचारणारे दोनच धीट पुरुष आढळले. त्‍यापैकी एक लोकमान्‍य टिळक आणि दुसरे जर्मन बादशहा कैसर विल्‍यम !’’

६. ईश्‍वरी उपासनेच्‍या मार्गाचे पालन करण्‍यातच देशहित !

लोकमान्‍य टिळकांनी हिंदु समाज, हिंदु संस्‍कृती, हिंदु धर्म, हिंदुत्‍व, राष्‍ट्रीयत्‍व, हिंदु-मुसलमान संबंध, समाज परिवर्तन अशा अनेक विषयांवर अग्रलेख लिहिले. त्‍यांच्‍या हिंदु श्रद्धेवर श्रीधर गणेश जिनसीवाले यांनी त्‍यांची थट्टा केली. त्‍याला उत्तर देतांना टिळक स्‍वतःच्‍या अग्रलेखात लिहितात, ‘‘मी हिंदु आहे. माझा धर्म वैदिक आहे. या धर्माच्‍या परंपरेने ईश्‍वराची उपासना करण्‍याचा जो मार्ग जोडून दिला आहे, तो पालटण्‍याची आवश्‍यकता नाही. तो मी पाळला पाहिजे. त्‍यातच माझे आणि माझ्‍या देशाचे कल्‍याण आहे.’’

७. टिळकांच्‍या आचरणातून दिसणारा हिंदुत्‍वाविषयीचा विश्‍वास !

‘मी हिंदु आहे, हिंदु राहीन, हिंदु म्‍हणूनच मरीन आणि हिंदुत्‍वानेच आपला अभ्‍युदय कधी ना कधी संपादन करीन’, असा पूर्ण विश्‍वास टिळक यांना होता. त्‍यांचा हा विश्‍वास त्‍यांच्‍या आचरणातून दिसून येत होता.

८. सामाजिक सुधारणेपेक्षा हिंदु धर्म आणि हिंदु राष्‍ट्र अधिक महत्त्वाचे !

‘सामाजिक सुधारणा महत्त्वाची आहे’, असे लोकमान्‍य टिळक म्‍हणायचे; पण ‘सामाजिक सुधारणेपेक्षाही हिंदु धर्म आणि हिंदु राष्‍ट्र हे अधिक महत्त्वाचे आहे’, असे ते ठणकावून सांगत. याविषयी स्‍पष्‍टीकरण देतांना टिळक म्‍हणतात, ‘‘जी सामाजिक सुधारणा हवी आहे, ती लोकांमध्‍ये राष्‍ट्रीयत्‍व उत्‍पन्‍न करण्‍याच्‍या कार्यासाठी, तसेच अभिमान, कळकळ आणि स्‍वार्थत्‍याग सहज घडवून आणण्‍यासाठी उपयुक्‍त ठरील.’’

९. हिंदु-मुसलमान संबंधांविषयी टिळकांचे परखड भाष्‍य !

हिंदु-मुसलमान संबंधांविषयी लोकमान्‍य टिळक म्‍हणतात, ‘‘हिंदु आणि मुसलमान यांचे धार्मिक आचरण अन् विचार यांत अंतर आहे. ते नाहीसे होऊन दोघेही एका विचाराचे आणि एका मनाचे होण्‍यास किती शतके लागतील; किंबहुना ते एकमनाचे होतील कि नाही ? हेही सांगता येत नाही. आमच्‍यापैकी काही मंडळी अशी आहेत की, मुसलमानांनी काहीही आगळीक केल्‍यास ‘भावी परिणामावर दृष्‍टी ठेवून बंधुत्‍वाच्‍या नात्‍याने आम्‍ही त्‍यांना आलिंगन द्यावे. क्षमा आणि शांती हे ब्रह्मगुण प्रकट करावेत’, अशा प्रकारचे प्रतिपादन ते करतात. आजची स्‍थिती लक्षात घेता हा पक्ष आम्‍हाला जराही मान्‍य नाही. इतकेच नव्‍हे, तर सरकारनेही तो मान्‍य करता कामा नये, अशी आमची समजूत आहे. हिंदुस्‍थानातील प्रजेचे सामान्‍य हक्‍क संपादन करण्‍यासाठी जरी आम्‍ही एक झालो, तरी धर्म, तसेच खाणे, पिणे, आचार आणि विचार या दृष्‍टीने हिंदु-मुसलमान यांच्‍यात जो भेद आहे, तो कित्‍येक शतके कायम राहील, या समजुतीवरच सरकारने आणि आम्‍ही त्‍याची योग्‍य व्‍यवस्‍था केली पाहिजे.’’

१०. समाजसुधारणेच्‍या इच्‍छाशक्‍तीपेक्षा राष्‍ट्रभक्‍ती अधिक श्रेष्‍ठ समजणारे टिळक !

लोकमान्‍य टिळक यांची राष्‍ट्रभक्‍ती ही त्‍यांच्‍या समाजसुधारणेच्‍या इच्‍छाशक्‍तीपेक्षा अधिक श्रेष्‍ठ आणि बलवान होती. याचा दाखला देतांना जोसेफ बॅप्‍टिस्‍टा यांनी बॅरिस्‍टर जयकर यांना स्‍वतःचा अनुभव सांगतांना म्‍हटले, ‘‘इस्‍लाम आणि इंग्‍लंड यांच्‍या सामाजिक सुधारणेच्‍या मार्गातील धूर्त शत्रू टिळक आहेत’, असे सामान्‍यपणे गृहित धरले जाते; पण जी गोष्‍ट त्‍यांच्‍या ज्‍वलंत राष्‍ट्रभक्‍तीशी जुळत नाही, त्‍या गोष्‍टीचा ते तिरस्‍कार करतात, अशी गोष्‍ट ते स्‍वीकारतच नाहीत. एकदा मी त्‍यांच्‍या समवेत बेळगावमधील पवित्र मंदिरात जेवलो होतो.’’ हे ऐकल्‍यावर बॅरिस्‍टर जयकर यांचा त्‍यावर विश्‍वास बसला नाही. लोकमान्‍य टिळक जोसेफ बॅप्‍टिस्‍टा यांना म्‍हणाले होते, ‘‘स्‍वराज्‍यासाठी समाजसुधारणा आवश्‍यक असेल, तर आम्‍ही धर्मभोळे लोक समाजसुधारणेच्‍या आड कधीही येणार नाही.’’

११. स्‍वराज्‍यासाठी घटस्‍फोटाविषयीचा निर्बंध हिंदु समाजाने स्‍वीकारला !

लोकमान्‍य टिळकांच्‍या या विचारांचा प्रभाव आजही हिंदु समाजमनावर टिकून आहे; म्‍हणूनच ‘घटस्‍फोट’ हा हिंदु समाजाच्‍या संस्‍कृतीला धरून नाही. विवाहाचे बंधन हे पती-पत्नी यांच्‍यात ७ जन्‍मांचे असते. ते कधीही तोडून टाकता येत नाही. तरीसुद्धा स्‍वराज्‍य टिकून रहाण्‍यासाठी घटस्‍फोटासंबंधित निर्माण झालेला निर्बंध हिंदु समाजाने स्‍वीकारला.

१२. लोकमान्‍य टिळक यांच्‍यासारखा एकही समाजसुधारक अन्‍य धर्मांत निर्माण न होणे, हे त्रिकालाबाधित सत्‍य !

हिंदु समाजाप्रमाणे अन्‍य धर्मियांमध्‍ये वैचारिक लवचिकता आढळून येत नाही. तरीही अन्‍य धर्मीय हिंदूंना संकुचित आणि जातीयवादी म्‍हणून दोष देतात. मुसलमान आणि ख्रिस्‍ती यांच्‍यात लोकमान्‍य टिळक किंवा स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍यासारखा एकही समाजसुधारक आढळत नाही. राष्‍ट्राच्‍या हितासाठी धर्मभोळेपणाचा त्‍याग करण्‍याची शिकवण मुसलमान आणि ख्रिस्‍ती यांना देणारा एकही समाजसुधारक त्‍यांच्‍या धर्मात निर्माण झालेला नाही. किंबहुना त्‍यांचा धर्म आणि संस्‍कृती यांना तसा तो निर्माण करता आला नाही, हे त्रिकालाबाधित सत्‍य आहे.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्‍वनिष्‍ठ व्‍याख्‍याते आणि लेखक, डोंबिवली. (१४.७.२०२३)


संपादकीय भुमिका

धर्माच्‍या परंपरेने ईश्‍वराची उपासना करण्‍याचा जो मार्ग जोडून दिला आहे, तो पाळण्‍यातच स्‍वतःसह देशाचे कल्‍याण आहे !