अलीकडेच नवी देहलीमध्ये मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले. साहित्य म्हटले की, समाजमनाचा तो आरसाच असतो. त्यामुळे समाजात घडणार्या विविध घटनांचे प्रतिबिंब आपल्याला साहित्यात पहायला मिळते. साहित्याची व्याप्ती इतकी मोठी की, त्यात राष्ट्रीय प्रेरणेसारखे विषयही अगदीच लीलया सामावले जातात. आज मराठी साहित्यामध्ये राष्ट्ररक्षण आणि साहस यांवर भाष्य करणारे साहित्य विपुल प्रमाणात आहे. या साहित्याचा वापरही देशाच्या सुरक्षाव्यवस्थेच्या सबलीकरणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे होत असतो. साहित्याच्या याच परिणामांचा घेतलेला हा आढावा…
(पूर्वार्ध)
१. सांस्कृतिक संरक्षण आणि संवर्धन
राष्ट्रनिर्मितीमध्ये साहित्य महत्त्वाची भूमिका बजावते. राष्ट्राची ओळख, संस्कृती आणि एकसंधता विकसित करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण मार्गांनी योगदानही देते. साहित्य परंपरा, चालीरिती, लोककथा आणि ऐतिहासिक कथा यांचे दस्तऐवजीकरण करून देशाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यास साहाय्य करते. साहित्य लोकांच्या सामूहिक स्मृती जिवंत ठेवते आणि भविष्यातील पिढ्यांपर्यंत पोचवते.

मराठी साहित्यामध्ये शरिरात वीरश्री निर्माण करणारी वीरगीते, कविता, पोवाडे यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक पोवाडे आणि वीरगीते ऐकल्यावर मनामध्ये देशभक्तीची भावना निर्माण होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अनेक वीरगीते जसे की, ‘हे अधम रक्त रंजिते । सुजन पूजिते श्री स्वतंत्रते… यशोयुतां वंदे ।। जयोस्तुते’ आणि देशभक्ती जागृत करणारे अनेक पोवाडे अजूनसुद्धा आपल्याला आठवतात.
२. राष्ट्रीय ओळख निर्मिती
साहित्य हे एक महत्त्वाचे शैक्षणिक साधन आहे, जे भाषाकौशल्य, टीकात्मक विचार आणि सृजनशीलता समृद्ध करते. साहित्य राष्ट्राशी संबंधित असणे म्हणजे काय ? हे परिभाषित करण्यास साहाय्य करते. अनेक लेखक राष्ट्रीय अस्मिता, इतिहास आणि मूल्ये या विषयांचा शोध सातत्याने त्यांच्या साहित्यात घेत असतात. यामुळे अशा साहित्य कलाकृतींचे राष्ट्रनिर्मितीमध्ये सहकार्य तर होतेच, तसेच यामुळे राष्ट्रीय एकात्मतेतही वाढ होतांना दिसते.
३. सार्वजनिक भावनांना प्रतिबिंबित करणे, आकार देणे
साहित्य हे राष्ट्राची प्रचलित मनःस्थिती, आशा आणि चिंता प्रतिबिंबित करते. लोक त्यांच्या राष्ट्राचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य कसे पहातात, यांवर प्रभाव टाकून ते सार्वजनिक भावनांना आकार देऊ शकते. साहित्यिक लिखाण अनेकदा प्रेरणा देतात, लोकांना उत्तेजित करू शकतात, त्यांना चांगल्या भविष्यासाठी प्रयत्न करण्यास आणि राष्ट्रीय विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्यास प्रोत्साहित करतात.
साहित्य हे देशभर आणि जागतिक स्तरावर राष्ट्राचे प्रतिनिधित्व करते. अनुवादित कृती आणि संबंधित लेखकांच्या आंतरराष्ट्रीय ओळखीच्या माध्यमातून एक राष्ट्र आपली संस्कृती, मूल्ये, इतिहास आणि कथा जगासमोर मांडू शकते. त्यामुळे स्वतःविषयीचा आंतरराष्ट्रीय आदरही वाढवू शकते. मराठीमध्ये अनेक शूर सेनापती आणि शूर सैनिक यांच्यावर अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील वर्ष १९४७ नंतरचे अनेक शूरवीर आहेत. अनुराधाताई गोरे यांनी सैनिकांच्या शौर्यगाथांवर लिहिलेली अनेक पुस्तके वाचनीय आहेत.
साहित्य हे केवळ राष्ट्रीय जीवनाचे प्रतिबिंब नसून ते जीवन घडवण्याचे शक्तीशाली साधन आहे. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध राष्ट्रनिर्मितीत साहित्याचे योगदान आहे. आपल्या बहुआयामी भूमिकांद्वारे साहित्य राष्ट्रनिर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देते. साहित्य वेगवेगळ्या कालखंडातील लोकांच्या जीवनातील त्यांच्या अनुभवांची अंतर्दृष्टी प्रदान करते. साहित्य देशाचा जागतिक प्रभाव आणि ‘सॉफ्ट पॉवर’ वाढवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते.
अनेक मराठी लेखकांनी युद्धावरील प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकांचा, मराठीत अनुवाद केला आहे, उदा. फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावर आधारित इंग्रजी पुस्तकांचा उत्तम अनुवाद भगवान दातार यांनी केला आहे. त्यांचे ‘ऑपरेशन ब्लू स्टार’वरचे पुस्तकसुद्धा उत्तम आहे. ही पुस्तके या विषयाला नक्कीच न्याय देतात.
४. राष्ट्रीय सुरक्षेच्या विविध पैलूंविषयी नागरिकांना माहिती
राष्ट्रीय सुरक्षेच्या विविध पैलूंविषयी नागरिकांना माहिती आणि शिक्षित करण्यात साहित्य महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. विविध शैली आणि कथनशैली यांद्वारे साहित्य जागरूकता अन् नागरिकांची समज वाढवू शकते, तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या सूत्रांवर चर्चा करण्यास प्रोत्साहनही साहित्याच्या माध्यमातून मिळते. ऐतिहासिक कादंबर्या आणि भूतकाळातील संघर्षांमधून सुरक्षा व्यवस्थेसमोर असलेल्या आव्हानांचा संदर्भ मिळतो. युद्धे, क्रांती आणि राजकीय उलथापालथ यांसारख्या घटनांविषयी लिहून, साहित्याद्वारे वाचकांना सुरक्षा समस्यांचे मूळ समजून घेण्यास साहाय्य होते.
५. देशाला असलेल्या धोक्यांविषयी जागरूकता वाढवणे
साहित्य राष्ट्रीय सुरक्षेसाठीचे विविध धोके, आतंकवाद, हेरगिरी, सायबर युद्ध आणि पर्यावरणीय आव्हानांपर्यंत प्रकाश टाकू शकते. चरित्रकथा आणि कथानके यांद्वारे, साहित्य राष्ट्रीय सुरक्षा निर्णयांशी संबंधित नैतिक आव्हाने शोधून काढते. कादंबर्या आणि लघुकथांच्या माध्यमातून संघर्षात अडकलेले सैनिक, निर्वासित आणि नागरिकांचे कष्टप्रद आयुष्य वाचकांपर्यंत पोचते. राष्ट्रीय सुरक्षा हा आता सर्वच नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. यामुळे असेही वाटते की, ‘देशाची सुरक्षा’ हा विषय आता शाळा आणि महाविद्यालय यांमध्ये शिकवण्यास प्रारंभ झाला पाहिजे.
राष्ट्रीय सुरक्षा समस्या समजून घेण्यास साहाय्य साहित्य हे धोरणकर्ते आणि जनता यांना राष्ट्रीय सुरक्षेच्या विविध पैलूंविषयी माहिती देऊ शकते. साहित्य हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये महत्त्वाचे साधन म्हणूनही काम करते. विद्यार्थी आणि भविष्यातील नेते यांना राष्ट्रीय सुरक्षा समस्या समजून घेण्यास साहाय्य करते. आज महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांमध्ये ‘डिफेन्स अँड स्ट्रेटेजिक स्टडीज’ हा विषय शिकवला जातो. त्यावर वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेले ‘पीएच्.डी.’चे (विद्यावाचस्पतींचे) शोधनिबंध उपलब्ध आहेत.
६. देशभक्ती अधोरेखित करणे
साहित्याद्वारे शौर्य आणि देशभक्तीचे कथाकथन केल्याने त्याद्वारे नागरिकांना प्रेरणा मिळू शकते. त्यातून राष्ट्रीय अभिमान आणि एकतेची भावना वाढवू शकते. साहित्य राष्ट्राच्या सुरक्षिततेविषयी चालू असलेल्या संवादामध्ये महत्त्वाचे साधन आहे.
साहित्य भारताच्या इतिहासाविषयी आणि विकसित होत असलेल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या समस्यांसंदर्भात मार्गदर्शन करू शकते. वेगवेगळ्या कालखंडातील कादंबर्या आणि ऐतिहासिक भूतकाळातील घटना, युद्ध आणि संघर्ष यांवर प्रकाश टाकू शकते. ज्याने देशाच्या सुरक्षा परिदृश्याला आकार दिला आहे. असे ऐतिहासिक संदर्भ समजून घेतल्याने वाचकांना भारतासमोरील आव्हानांची माहिती मिळू शकते.
प्रत्येक विद्यार्थ्याला प्रतिवर्षी ‘देशाची सुरक्षा’ या विषयावर प्रकाशित झालेल्या पुस्तकाची समीक्षा लिहिणे अनिवार्य केले जावे; कारण पुस्तके लिहिणे हा एक भाग आहे; परंतु अधिक महत्त्वाचे आहे की, लिहिलेली पुस्तके वाचणे, तसेच त्यातील माहितीचा वापर करून भविष्यात देशासमोर असलेल्या आव्हानांचा सामना करण्याकडे लक्ष केंद्रित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी सैनिक, गुप्तचर अधिकारी आणि इतर व्यक्तींनी केलेले बलीदान वाचकांमध्ये कर्तव्य आणि दायित्व यांची भावना निर्माण करू शकते.
७. ‘छत्रपती शिवाजी महाराज’, ‘पेशव्यांचा इतिहास’ या विषयांवरील अनेक अभ्यासपूर्ण पुस्तके
‘मराठ्यांचा इतिहास’, ‘छत्रपती शिवाजी महाराज’, ‘पेशव्यांचा इतिहास’ या विषयावर अनेक अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिण्यात आली असून अजूनसुद्धा ती लिहिली जात आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. मुंजे यांसारख्या लेखकांनी दुसर्या महायुद्धावरसुद्धा पुष्कळ लिखाण केलेले आहे. प्रसिद्ध युद्धतज्ञ आणि इतिहासकार क्लॉजविट्झ यांचे जगप्रसिद्ध पुस्तक ‘ऑन वॉर कार्ल फॉन क्लॉजविट्झ’ या गाजलेल्या ग्रंथाचे चिकित्सक रूपांतर मराठी लेखक दि.वि. गोखले यांनी ‘युद्धमीमांसा’ या पुस्तकात केले आहे. ज्यांना ‘युद्धकला’ यावर अभ्यास करायचा आहे, त्यांनी हे पुस्तक अवश्य वाचावे. ‘दुसर्या महायुद्धातील युद्ध ‘नेतृत्व’ ज्यामध्ये चर्चिल, हिटलर, रुझवेल्ट आणि स्टॅलिनही सामील आहेत. दि.वि. गोखले यांचे हे पुस्तक अतिशय वाचनीय, विश्लेषण केलेले असेच आहे.
‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुस्तक अजरामरच आहे. सावरकर यांचे ‘सहा सोनेरी पाने’ हे भारतीय इतिहासातील ६ महत्त्वपूर्ण घटनांचे ऐतिहासिक वर्णन आहे. त्यांच्या ज्वलंत कथनाद्वारे आणि धोरणात्मक विचार, स्वावलंबन अन् धैर्य यांच्या महत्त्वांवर भर देऊन सावरकर वाचकांमध्ये कर्तव्याची भावना, तसेच राष्ट्रीय सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करतात.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘राजा शिवछत्रपती’ हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे एक विस्तृत चरित्र आहे, जे महाराष्ट्रातील एक महान योद्धे आणि सामरिक कौशल्य अन् राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे. हे कार्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लष्करी धोरणांवर प्रकाश टाकते. हिंदवी साम्राज्य मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांच्या लोकांचे रक्षण करण्यासाठी त्यांचे अथक समर्पण, राष्ट्रीय सुरक्षा अन् नेतृत्व यांच्या महत्त्वावर तरुणांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शक म्हणून काम करते.
(क्रमश:)
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.
(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’)