राधानगरी धरणाची ४ द्वारे उघडल्‍याने कोल्‍हापुरात पंचगंगा नदी ४५ फूट पाणीपातळी गाठण्‍याची शक्‍यता ! – राहुल रेखावार, जिल्‍हाधिकारी, कोल्‍हापूर

कोल्‍हापूर, २५ जुलै (वार्ता.) – धरणक्षेत्रात सातत्‍याने पाऊस चालू असल्‍याने राधानगरी धरण पूर्णपणे भरल्‍याने त्‍याची ४ स्‍वयंचलीत द्वारे उघडल्‍यात आली आहेत. याचसमवेत कुंभी, कासारी आणि राधानगरी या धरणांचे मिळून अंदाजे ८ सहस्र घनफूट प्रतिसेकंद पाणी पंचगंगेत येण्‍याची शक्‍यता असल्‍याने कोल्‍हापूर शहरात पंचगंगा नदीची पातळी ४५ फुटांपर्यंत जाण्‍याची शक्‍यता आहे. गत दोन्‍ही पुरांचे अनुभव पहाता ४५ फुटांपर्यंत पाणी ज्‍या ज्‍या ठिकाणी येते त्‍यांना तात्‍पुरत्‍या केलेल्‍या निवार्‍यांमध्‍ये नागरिकांना विस्‍थापित होण्‍याच्‍या सूचना केल्‍या आहेत, अशी माहिती कोल्‍हापूरचे जिल्‍हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्‍हापूरचे जिल्‍हाधिकारी राहुल रेखावार

१. कोल्‍हापूर शहरासह पूरग्रस्‍त गावांतील २८ शाळांना सुट्टी देण्‍यात आली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्‍या सूचनांचे पालन करावे. नागरिकांना ज्‍या ठिकाणी स्‍थलांतरित व्‍हावे लागेल त्‍या ठिकाणी त्‍यांचे भोजन, पाणी, स्‍वच्‍छता, तसेच अन्‍य सर्व व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. नागरिकांनी घरे सोडल्‍यानंतर पोलिसांचे पथक बंद असलेल्‍या घरांच्‍या आजूबाजूला पहारा देण्‍याचे काम करणार आहे. त्‍यामुळे त्‍याविषयी नागरिकांनी काळजी करू नये.

२. कर्नाटक येथील आलमट्टी धरणाशी सातत्‍याने आमचा समन्‍वय असून १५ ऑगस्‍टअखेर धरणाची पाणीपातळी ५१७.५ मीटर ठेवण्‍याविषयी एकमत झालेले आहे. या धरणाच्‍या हिप्‍परगा येथील बंधार्‍यांच्‍या २२ बरग्‍यांपैकी २० बरगे खुले करण्‍यात आले आहेत. सध्‍या कोयना धरणातून कोणत्‍याही प्रकारचा विसर्ग चालू नाही आणि कृष्‍णा नदीची पातळी अल्‍प असल्‍याने फार मोठा धोका नाही.

३. सध्‍या ‘एन्.डी.आर्.एफ्.’च्‍या सैनिकांची एक तुकडी जिल्‍ह्यात तैनात करण्‍यात आली असून आवश्‍यकतेनुसार अधिक साहाय्‍य तात्‍काळ मागवण्‍यात येईल.

४. धरणातून सोडलेले पाणी साधारणत: १५ घंट्यांमध्‍ये कोल्‍हापूर शहरात येईल यानंतर ६ घंट्यांमध्‍ये इचलकरंजी आणि पुढील ६ घंट्यांमध्‍ये शिरोळ येथे येईल. त्‍या दृष्‍टीने प्रशासनाने सर्व सिद्धता केलेली आहे.

५. काळम्‍मावाडी धरणाच्‍या गळतीच्‍या संदर्भात दुरुस्‍तीचा प्रस्‍ताव (८२ कोटी रुपये) जलसंधारण विभागाकडे सादर करण्‍यात आला आहे. हा प्रस्‍ताव संमत झाल्‍यावर तात्‍काळ याच्‍या दुरुस्‍तीचे काम हाती घेण्‍यात येईल.

पूरपट्ट्यात झालेली बांधकामेच पूर येण्‍यास कारणीभूत नाहीत !

कोल्‍हापूर जिल्‍ह्यात सध्‍या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. धरणक्षेत्रातून नदीत येणारे पाणी हे केवळ १५ ते २० टक्‍के आहे. उर्वरित मार्गाने येणारे पाणी पंचगंगा नदीत मिसळते. त्‍यामुळे पूरपट्ट्यात झालेली बांधकामेच पूर येण्‍यास कारणीभूत आहेत, असे नाही. शासनाने जेव्‍हा पुराच्‍या पार्श्‍वभूमीवर लाल आणि नीळी रेषा आखली त्‍यानंतर महापालिकेने त्‍या रेषेच्‍या आत बांधकामे करण्‍यास कोणतीही अनुमती दिलेली नाही. त्‍या पूर्वी झालेल्‍या बांधकामांविषयी काय करावे ? यांसाठी आम्‍ही शासनाकडे विचारणा केली आहे. या संदर्भात शासनाला धोरणात्‍मक निर्णय घ्‍यावा लागणार आहे, असे जिल्‍हाधिकारी म्‍हणाले.

प्रशासनाकडून ‘पब्‍लिक अ‍ॅड्रेस सिस्‍टीम’ कार्यान्‍वित !

आपत्‍कालीन परिस्‍थिती उद़्‍भवू नये, जीवितहानी होऊ नये यासाठी तातडीने सर्वसामान्‍य नागरिकांपर्यंत आवश्‍यक संदेश पोहोचवण्‍यासाठी प्रशासनाच्‍या वतीने बसविण्‍यात आलेल्‍या ‘पब्‍लिक अ‍ॅड्रेस सिस्‍टीम’चा वापर करण्‍यात येत आहे. याद्वारे सामाजिक माध्‍यमे, वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्‍या, तसेच गावांतील पारंपरिक माध्‍यमे यांद्वारे तातडीने संदेश देण्‍यात येत आहेत. यामुळे प्रशासनासह सर्व नागरिक येणार्‍या परिस्‍थितीला सामोरे जाण्‍यासाठी सज्‍ज झाले आहेत.

कर्नाटकातील आलमट्टी धरणातून सध्‍या ४२ सहस्र घनफूट प्रतिसेकंद विसर्ग चालू असून हा विसर्ग लवकरच ७५ सहस्र घनफूट प्रतिसेकंद करण्‍यात येणार आहे, अशी माहिती धरण प्रशासनाच्‍या वतीने देण्‍यात आली आहे.