पाकमध्ये गेलेल्या राजस्थानमधील विवाहित ख्रिस्ती धर्मीय अंजू हिने केला प्रियकर नसरूद्दीनशी विवाह !

अंजू विक्षिप्त असल्याचा वडिलांचा दावा !

जयपूर (राजस्थान) – राजस्थानमधील भिवाडी येथे रहाणारी अंजू नावाची विवाहित ख्रिस्ती महिला पाकिस्तानात तिच्या प्रियकराकडे गेल्याचे समोर आल्यानंतर आता तिने तेथे तिचा प्रियकर नसरूद्दीन याच्याशी न्यायालयाच्या माध्यमातून विवाह केला आहे. त्यापूर्वी तिने इस्लाम धर्मही स्वीकारला आहे. याविषयीची माहिती तिने सामाजिक माध्यमांद्वारे दिली आहे. अंजू ‘जयपूर येथे जाते’ असे पतीला सांगून ती पाकमधील खैबर पख्तुनख्वा येथे गेली होती. याविषयी अंजूचे वडील गया प्रसाद थॉमस यांनी सांगितले की, माझी मुलगी अंजू मानसिकदृष्ट्या स्थिर नाही. ती विक्षिप्त आहे.

१. थॉमस पुढे म्हणाले की, तिचे लग्न झाल्यापासून, म्हणजेच मागच्या २० वर्षांपासून आमचा फारसा संपर्क नाही. लग्नानंतर ती भिवाडी या ठिकाणी तिच्या पतीसह रहात आहे, तर मी मध्यप्रदेशातील एका गावात वास्तव्यास आहे. माझा जावई अरविंद हा एकदम साधा माणूस आहे. अंजू मात्र विक्षिप्त आहे. तिचे तिच्या पाकमधील मित्राशी संबंध वगैरे असतीलल, असेही मला वाटत नाही. ती केवळ विक्षिप्तपणातून किंवा डोक्यात एक सणक आली; म्हणून त्याला भेटायला गेली असेल, एवढे मी निश्‍चितपणे सांगू शकतो.

२. याविषयी साहाय्यक पोलीस अधीक्षक सुजीत शंकर म्हणाले की, अंजू नावाची महिला पाकिस्तानला गेल्याचे आम्हाला वृत्तवाहिन्यांमधील बातम्यांद्वारे समजले. पाकिस्तानात ती तिच्या प्रियकराकडे गेली आहे. तो फेसबुक, ‘व्हॉट्स अ‍ॅप कॉलिंग’ या माध्यमांतून तिच्या संपर्कात आला होता. वर्ष २०२० मध्ये अंजूने पारपत्रासाठी अर्ज केला होता. ती पाकिस्तानात कशी गेली ? ते आम्हाला समजू शकलेले नाही. अद्याप याविषयी आम्हाला कुठलीही तक्रार मिळालेली नाही. आम्ही आमच्या पद्धतीने चौकशी करत आहोत.