जनता नीतीमान असावी, यासाठी जनतेला साधना शिकवून ती करवून घेणे आवश्यक !
देशात ५६ टक्के तरुणींनी मान्य केले की, त्या घराबाहेर असल्यावर शारीरिक संबंध ठेवतात, तर ३२ टक्के पुरुष घराबाहेर असतांना संबंध ठेवण्यास प्राधान्य देतात, असे केंद्रशासनाने केलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून दिसून आले आहे. अशा प्रकारचे शारीरिक संबंध ठेवणे, ही अनैतिक गोष्ट आहे आणि समाजाला ते मान्य नाही. समाज त्याला स्वीकारत नाही. अशा लोकांकडे समाज चांगल्या दृष्टीने पहात नाही. काही इस्लामी देशांत अशा गोष्टींसाठी कठोर शिक्षा केल्या जातात. भारतात अशा शिक्षा होत नाहीत. ‘अशा प्रकारची कृती करणे, हा प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनातील भाग आहे. त्यात अन्य कुणाला ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही’, असेही म्हटले जाऊ शकते. त्यासाठी अन्यही बरेच तर्क दिले जाऊ शकतात; मात्र समाजात अशा गोष्टींना नैतिक मानले जात नाही, हे स्पष्ट आहे. सरकारच्या या सर्वेक्षणातून पुढे काय होणार ? हे ठाऊक नाही. समाजातील ही अनैतिकता कशी थांबवली जाणार ? याचेही उत्तर नाही. हे सर्वेक्षण एच्.आय.व्ही.च्या संदर्भात करण्यात आले होते. एकापेक्षा अनेकांशी शारीरिक संबंध ठेवल्याने एच्.आय.व्ही.ची बाधा होते. म्हणजेच अनैतिकतेतून शारीरिक आजार होतात, असेही दिसते. पुढे यामुळे घरांमध्ये वादही होऊ शकतात आणि मानसिक ताणतणाव निर्माण होऊ शकतात. एका घटनेत एक तरुणी तिच्या प्रियकरासमवेत काही वर्षे ‘लिव्ह इन रिलेशिनशिप’मध्ये (विवाह न करता सहमतीने एकत्र रहाणे) होती आणि त्यांच्यात सहमतीने शारीरिक संबंध होते. नंतर प्रियकराने अन्य तरुणीशी विवाह केला. त्यानंतरही या दोघांमध्ये संबंध होते. नंतर या तरुणीने प्रियकराच्या विरोधात फसवणूक करून लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला; मात्र न्यायालयाने ‘जोडीदाराने लग्नास नकार दिल्यास सहमतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधांना लैंगिक शोषण म्हणता येणार नाही’, असे सांगत तो फेटाळला. म्हणजेच काय नैतिक आणि काय अनैतिक हे स्थितीनुसार पालटू शकते, हेही दिसून येते.
संस्कारांचे महत्त्व !
नैतिक आणि अनैतिक यांचा संघर्ष सतत चालू असतो. प्रत्येक कृतीला फळ मिळते, तसे नैतिक आणि अनैतिक गोष्ट केल्यास त्याला तसे फळ मिळते. धर्मानुसार नैतिक गोष्ट योग्य मानली जाते, तर अनैतिक अयोग्य आणि पाप समजले जाते. याचे शिक्षण हे घरातून पालकांनी मुलांना द्यायचे असते. शाळेतून ते शिकवले जाते आणि समाजामध्ये तसे वातावरण असेल, तर नागरिकांकडून त्याचे पालन होते. यातील एक सूत्र जर दुर्बल झाले, तर त्याचा परिणाम नैतिकतेवर होतो आणि तेथून अनैतिकता चालू होते. आज या सूत्रांचा अभ्यास केला, तर काय चित्र दिसते ? घरांतून जे काही संस्कार करणे आवश्यक आहे, तसे संस्कार करण्याचे प्रमाण अल्प होत चालले आहे. याउलट घरातून मुलांवर अनैतिक गोष्टींचे प्रदर्शन अधिक होत असल्याचे दिसते. याला दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम, चित्रपट यांचा प्रमुख वाटा आहे. दुसरीकडे पालकांना मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी वेळच नाही. ते त्यांच्या नोकरी-व्यवसायामध्ये व्यस्त झालेले आहेत. शाळांमध्ये काय स्थिती आहे ? शाळांतील अभ्यासक्रम मुलांवर संस्कार करणारे असावेत, या दृष्टीने बनवण्यात आलेले असतात. तसा प्रयत्न शाळांमधून त्यांच्या वेळेत केला जातो; मात्र मुले अधिक वेळ घरी आणि समाज येथे वावरत असतात. तेथील वातावरणाचा त्यांच्यावर अधिक परिणाम होत असतो. त्यामुळे समाजामध्येही नैतिकता असणे आवश्यक आहे. आज तसे आहे का ? असे कुणी विचारल्यास ‘नाही’ असेच बहुसंख्य लोकांचे उत्तर असणार आहे. अशा वेळी नैतिकतेचा संस्कार किती होणार ? आणि झाला, तरी त्यानुसार कृती किती प्रमाणात होणार ? याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ‘समाजात नैतिकता राखण्याचे दायित्व शासनकर्ते, प्रशासन, पोलीस आणि न्यायपालिका यांचे आहे’, असे म्हटल्यास तसे प्रयत्न त्यांच्याकडून किती प्रमाणात होत आहेत ? याचेही विश्लेषण करणे आवश्यक ठरते. जर ते करायचे ठरवले, तर शासनकर्त्यांमध्ये किती नैतिकता शिल्लक आहे ? यापासून विचार करावा लागणार आहे. ‘मग असे शासनकर्ते समाजामध्ये नैतिकता कशी निर्माण करतील ?’, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. प्रशासन आणि पोलीस हे सरकारच्या नियंत्रणात असल्याने ते स्वतंत्रपणे किंवा नियमांना आणि कायद्यांना धरून वागत नाहीत, असेच जनतेला अनेकदा दिसून येते. भ्रष्टाचार ही अनैतिक गोष्ट आहे; मात्र आज ‘भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे’, अशीच भावना जनतेमध्ये आहे. या ‘शिष्टाचारा’चे पालनपोषण शासनकर्ते, प्रशासन, पोलीस करत आहेत, असेही जनतेला दिसून येते. न्यायपालिकेने नैतिकता टिकवून ठेवून अनैतिक गोष्टी करणार्यांना कठोर शिक्षा करण्याची आवश्यकता आहे; मात्र हे प्रमाण नगण्य असल्याचे दिसते; मग समाजामध्ये नैतिकता टिकून कशी रहाणार ? हा मूळ प्रश्न कायम रहातो.
धर्माचरण हवे !
हिंदु धर्मामध्ये प्रत्येक कृती ही नैतिकतेने करण्यास सांगितली आहे आणि ती करण्यामागील हेतू, शास्त्र हे स्पष्ट केलेले आहे. नैतिकता रुजण्यासाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये संस्कार कशा प्रकारचे होत आहेत, हे महत्त्वाचे आहे. हिंदु धर्माचे शिक्षण प्रत्येक हिंदूला मिळाल्यास आणि त्याच्याकडून धर्माचरण करवून घेतल्यास तो अनैतिक कृती करण्याची शक्यता दुर्मिळ होईल. असा प्रयत्न आताच्या व्यवस्थेमध्ये शक्य नाही. त्यामुळे व्यवस्थेत काही पालट आवश्यक आहेत. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याने सरकारी स्तरावरून धर्मशिक्षण देता येणार नाही; म्हणून प्रथम भारताला अधिकृतरित्या ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे आवश्यक आहे. त्यानंतर हिंदु धर्मशास्त्रानुसार सरकारकडून प्रत्येक हिंदूला धर्मशिक्षण देऊन त्यानुसार आचरण करण्यास बाध्य केले पाहिजे. साधना करवून घेतली पाहिजे. असे झाले, तर त्याचा परिणाम केवळ नैतिकता निर्माण होण्यावरच नाही, तर प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येईल. तसेच शासन (राज्यकर्ते), प्रशासन, पोलीस आणि न्यायपालिका यांमध्ये धर्माचरणी लोक असतील अन् भारत हा आध्यात्मिकदृष्ट्या विश्वगुरु ठरेल.