मणीपूर येथील हिंसाचारातील उघड होणार्या भयावह घटनांतील दोषींना शोधून सरकार त्यांना कठोर शिक्षा केव्हा करणार ?
मणीपूर येथे २ महिलांची विवस्त्र धिंड काढल्याची घटना उघडकीस आल्यावर तेथे चालू असलेली भीषणता जगासमोर आली. मणीपूर येथे हिंदु मैतेई आणि ख्रिस्ती कुकी यांच्यात चालू असणारा संघर्ष या निमित्ताने जगासमोर नव्याने आला. मणीपूर येथे २ महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या घटनेमुळे भारतवासियांना हादरा दिला. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याविषयी भाष्य केले. मणीपूरविषयी सर्वांचीच सतर्कता आणि जाणिवा वाढल्या आहेत. त्यामुळे अन्य नियतकालिके आणि सामाजिक माध्यमे यांवरून याविषयी लोक स्वत:हून माहिती देत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. मणीपूर येथील चुराचंद्रपूर या भागात २ महिलांना विवस्त्र करण्याची जी घटना घडली, तेथेच हिंदु मैतेई समाजाच्या ४० स्त्रियांवर बलात्कार करण्यात आला, अशीही माहिती समोर येत आहे. याविषयी अन्वेषण यंत्रणांनी अधिक माहिती घेण्याची आवश्यकता आहे. मणीपूर येथील अन्य एका घटनेत मैतेई समाजातील एका ८० वर्षांच्या महिलेला घरात कोंडून तिचे घर पेटवून दिल्यामुळे ती जिवंत जळून मृत्यूमुखी पडल्याची घटनाही उघड झाली आहे. अशा किती तरी घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडत आहेत आणि त्या हळूहळू बाहेर येत आहेत. गेल्या २ मासांपासून मणीपूर पेटले आहे आणि विशेषत: तेथील पठारी भागात रहाणारा हिंदु मैतेई समाज न्याय मिळवण्यासाठी धडपडत असतांना तो ख्रिस्ती असलेल्या कुकी समाजाच्या अत्याचारांना सामोरे गेलेला आहे. मणीपूर येथे डोंगराळ भागात रहाणार्या आदिवासी समाजाने जेव्हापासून ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करून घेतले आहे, तेव्हापासून हा संघर्ष पठारी आणि डोंगराळ भागातील लोक यांच्यातील न रहाता हिंदु अन् सशस्त्र ख्रिस्ती यांच्यातील आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
देशविरोधी शक्तींचा शोध घेणे आवश्यक !
‘आदिवासी असणारा ख्रिस्ती कुकी समाज एवढा शस्त्रसज्ज कसा झाला ?’, याचे अन्वेषण होण्याची खरेतर आवश्यकता आहे. याला पुष्टी देणारा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. ज्यामध्ये ख्रिस्ती कुकी हे बाहेरील घुसखोरांच्या साहाय्याने एक सैन्य बनवून त्याचे संचलन करतांना दिसत आहेत. (म्यानमारचे सैन्य आणि ख्रिस्ती संस्था यांच्या आर्थिक साहाय्यातून हे सैन्य उभे केल्याचे म्हटले जाते.) त्यामध्ये हे तथाकथित सैन्य ‘भारतीय सैन्य त्यांचे काहीच वाकडे करू शकणार नाही’, अशा आशयाच्या घोषणा देत संचलन करत असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. एक समाज देशाबाहेरील शक्तींचे साहाय्य घेऊन देशात ‘एक लढाऊ गट’ सिद्ध करून त्याचे प्रदर्शन करतो, तरी त्याविरुद्ध काही कारवाई का होत नाही ? तसेच सरकारला याची माहिती त्वरित का होत नाही ? हेसुद्धा लक्षात येत नाही. या संघर्षात हिंदु मैतेईंना अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याच्या निर्णयाचा एवढा मोठा परिणाम एका राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्यात होणे, म्हणजे येथे बाहेरील शक्तीच कार्यरत आहेत, हे लक्षात येते. धर्मांतरित झालेल्या ख्रिस्ती कुकींना हिंदु मैतेई समाजाविषयी एवढा तिटकारा कसा काय निर्माण होऊ शकतो ? याचाच अर्थ या तणावाच्या आगीत निश्चितपणे कुणी ना कुणी तेल ओतण्याचे काम करत आहे. जेणेकरून मणीपूर पेटते राहील आणि भारतातील परिस्थिती अशांत राहील.
काही जणांनी मणीपूर येथील सैन्याचे मुख्यालय असलेल्या कागला फोर्ट येथे जुलै २००४ मध्ये तेथील काही महिलांकडून झालेल्या विवस्त्र निदर्शनांविषयी सांगितले आहे. मणीपूर येथे लागू असलेला ‘अफस्पा’ कायदा (सैन्याला दिलेला विशेषाधिकाराचा कायदा) हटवण्यासाठी तेथील काही महिलांनी विवस्त्र होऊन निदर्शने केली होती. ती छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित करून ‘यांना विवस्त्र होण्यास कुणी सांगितले होते ? याचा शोध घेतला पाहिजे; कारण या महिला स्वत:हून विवस्त्र होणार नाहीत. भारतीय सैन्याला म्हणजे भारत शासनाला विरोध करण्यासाठी, त्याची अपकीर्ती करण्यासाठी असे प्रकार केले जात आहेत का ?’, असे संदेश पाठवण्यात आले. आता जुन्या घटनांविषयी बाहेर येत असलेले हे व्हिडिओ आणि छायाचित्रे यांवरून समाजमन किती संवेदनशील बनले आहे ? हे लक्षात येते. मणीपूर येथे महिलांचा अवमान करणार्या घटना घडणार नाहीत, याविषयी केंद्रशासनाने सतर्क आणि सजग रहाण्याची आवश्यकता आहे.
महिलांवरील अत्याचारांविषयी जागृती हवी !
मणीपूरची महिलांविषयीची घटना घडल्यावर ‘बंगालमध्ये पंचायतींच्या निवडणुकांच्या वेळी एका महिला उमेदवारालाही विवस्त्र करून तिची धिंड काढण्यात आली’, असे भाजपच्या महिला प्रवक्त्याने प्रसारमाध्यमांसमोर रडत सांगितले. तसेच ‘भारतात आम्हा महिलांची ही स्थिती आहे’, अशी खंतही बोलून दाखवली. बंगालमध्ये चोरी करणार्या महिला म्हणून २ महिलांना विवस्त्र करून महिलांच्या जमावाने मारहाण करत धिंड काढली. तेथे पोलीस उपस्थित असूनही त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. खरेतर त्यांच्यावरच कारवाई झाली पाहिजे, तसेच बंगालमध्येच काही दिवसांपूर्वी एका हिंदु तरुणीवर एका धर्मांधाने बलात्कार करून तिची हत्या केली. तेव्हा बंगाल पोलिसांनी तिचा मृतदेह विवस्त्र स्थितीतच रस्त्यावरून फरफटत नेला. हा मृतदेह रस्त्यावरून नेत असतांना सर्व भारताने पाहिले, तरी त्याविरुद्ध कुणीच आवाज का उठवला नाही ? खरेतर या कृतीमुळे बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी त्यागपत्र द्यायला हवे होते. मुख्यमंत्रीपदी एक महिला असूनही त्याच राज्यात आणि विशेषत: हिंदु महिलांवर अत्याचार होणे, हे अत्यंत चीड आणणारे आहे. याविरुद्ध अन्य राजकीय पक्ष विशेषत: काँग्रेस गप्प का राहिला ? या ठिकाणी ‘अत्याचार करणारा धर्मांध होता आणि अत्याचारीत मुलगी हिंदु होती’, म्हणून अत्याचाराची तीव्रता काँग्रेसच्या लेखी उणावली आहे का ? मणीपूर आणि बंगाल येथील महिलांवर अत्याचार करणार्यांना शोधून त्यांना कठोर शिक्षा करण्याचे काम केंद्रशासनाने तत्परतेने करावे, हीच देशवासियांची इच्छा !