‘चंद्रयान-३’ मोहिमेमुळे केवळ ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’च्या (‘इस्रो’च्या) शास्त्रज्ञांच्याच नव्हे, तर भारतियांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला. जगाच्या पातळीवर भारत केवळ भूमीवर आणि पाण्यातच नव्हे, तर अवकाशातील स्पर्धेतही आघाडीवर असल्याचे या मोहिमेने दाखवून दिले. यामध्ये पुरुष शास्त्रज्ञांप्रमाणे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर महिला शास्त्रज्ञही सहभागी झाल्या होत्या. चंद्रयानाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर सामाजिक माध्यमांवर साडी नेसलेल्या, डोक्यात गजरा माळलेल्या आणि कपाळावर टिकली लावलेल्या ‘इस्रो’च्या महिला शास्त्रज्ञांचे आनंद व्यक्त करतांनाचे छायाचित्र प्रसारित झाले. ‘संस्कृती ही तंत्रज्ञानाच्या आड कधीच येत नाही’, हे या छायाचित्राने जगाला दाखवून दिले.
‘तोकडे किंवा पाश्चात्त्य कपडे, म्हणजे आधुनिकपणा’, ‘इंग्रजी बोलणे, म्हणजे पुढारलेपण’, अशा चुकीच्या संकल्पनांमुळे आज अनेक महिला आणि युवती अयोग्य वाटेवर चालल्या आहेत. साधी साडी किंवा साधा पेहराव असेल, तर त्या व्यक्तीला खेडवळ, अडाणी किंवा गावंढळ समजले जाते. यामुळे सध्या आधुनिकतेच्या आणि स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली स्त्रियांची अधोगती होत आहे. आज समाज प्रथम एखादी व्यक्ती किती आधुनिक रहाते ?, यावरून त्याची ओळख ठेवतो किंवा त्याला महत्त्व देतो. त्यातील पोकळपणा ‘इस्रो’मधील महिला शास्त्रज्ञांनी दाखवून दिला आहे.
टी-शर्ट, जीन्स यांसारख्या राजसिक-तामसिक वेशभूषेमुळे स्त्रीची वृत्ती उच्छृंखल आणि भोगवादी बनते, तर सहावारी अन् नऊवारी साडी या सात्त्विक वेशभूषेमुळे वातावरणातील चैतन्य स्त्री अधिक प्रमाणात ग्रहण करू शकते आणि तिचे वागणे, बोलणे, चालणे हे सर्व शालीन आणि नम्र बनते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारतातील सर्वोच्च आयटी आस्थापन ‘इन्फोसिस’च्या सहसंस्थापिका आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या अध्यक्षा सुधा मूर्ती ! सुधा मूर्ती इतक्या साधेपणाने जगतात की, ‘त्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीच्या मालकीण आहेत’, असे त्यांना पाहून कुणीही म्हणू शकणार नाही.
स्त्री ही शक्ती आहे ! ती जेव्हा धर्माचरण करून मर्यादेने वागेल, तेव्हाच तिच्यामधील दुर्गादेवीची शक्ती कार्यरत होईल. या शक्तीमुळे तिच्यावर हात टाकणे तर सोडाच; परंतु कुणी वाकड्या दृष्टीने पाहूही शकणार नाही. आज स्त्रीची होणारी छळवणूकही थांबेल. यासाठी स्त्रियांनी धर्माचरण करून स्वतःतील स्त्रीशक्ती जागृत करावी !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे