कोणतीही कृती करतांना मुखी देवाचे नाव असायला हवे, हे प्रत्येकच धार्मिक व्यक्ती जाणते. मग ती कृती कोणतीही असू दे, देवाचे नाव घेतल्यास प्रत्येकाला त्यात यश मिळतेच. कुणी श्रीकृष्णाचे नाम घेतो, तर कुणी गणपतीबाप्पाला आळवतो, तर कुणी ‘जय श्रीराम’ म्हणतो. भगवंताचे नाम घेण्यात प्रत्येकामध्ये विविधता आहे. असेच एक वैशिष्ट्य तमिळनाडूतही आढळते. तेथील तिरुवल्लरू गावात सर्वसामान्यांप्रमाणे ज्वारी, बाजरी किंवा तांदूळ यांची शेती आढळत नाही, तर तेथे केवळ तुळशीची शेती केली जाते. या शेतीचे वैशिष्ट्य, म्हणजे येथील तुळस प्रतिदिन श्री तिरुपती बालाजी मंदिरात पाठवली जाते. येथील भाविक शेतकर्यांचा या तुळशीप्रती तितकाच भाव आहे. त्यामुळे येथे अन्य प्रकारची शेती नसते. येथील शेतकरी तुळस तोडतांना ‘विष्णुसहस्रनाम’ म्हणतात. ‘ती म्हणत खुडलेली तुळस श्रीविष्णुचरणी अर्पण होणार आहे’, असा त्यांचा भाव असतो. विष्णुनामातील चैतन्यामुळे शेतातील वातावरणात सात्त्विकता निर्माण होते आणि आनंदाची स्पंदने सर्वदूर पसरतात. त्याचा सर्वांनाच लाभ होतो. केवळ आणि केवळ तुळशीची शेती करणे, हा येथील शेतकर्यांचा श्री बालाजीप्रतीचा किती मोठा त्याग आहे ! त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे ! त्यामुळेच तर बालाजी मंदिरात गेल्यावर प्रत्येकाला चैतन्याची अनुभूती येते. त्यात या तुळशीचा, तसेच तुळस खुडतांना म्हणण्यात येणार्या ‘विष्णुसहस्रनाम’ स्तोत्राचा वाटा मोठा आहे.
सर्वत्रच्या शेतकर्यांनी अशा प्रकारे देवाचे नाम घेत शेती करायला हवी. बर्याचदा असे लक्षात येते की, भ्रमणभाषवर चित्रपटाची गाणी लावून ती गुणगुणत तेथील कामे केली जातात. यात शरिराला अधिक प्रमाणात थकवा येतो. उलट देवाच्या नामातील शक्तीमुळे कोणतेही काम करतांना उत्साह येतो. अशाच प्रकारे तिरुवल्लरू गावातील शेतकर्यांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येकानेच नित्य कर्मे करतांना भगवंताचे नाम मुखी ठेवायला हवे किंवा स्तोत्रपठण करायला हवे. एखाद्या गृहिणीने स्वयंपाक करण्यापूर्वी श्री अन्नपूर्णादेवीला प्रार्थना केल्यास किंवा नामजप करत स्वयंपाक बनवल्यास ती स्पंदने अन्नात उतरतात आणि ते अन्नही अतिशय रुचकर अन् स्वादिष्ट बनते. हे सामर्थ्य केवळ देवाच्या नामात आहे. एखाद्या चित्रपटाचे गीत म्हणत किंवा दूरचित्रवाणी पहात स्वयंपाक केल्यास त्यातील रज-तमात्मक स्पंदने अन्नात येतात आणि त्या अन्नाचा शरिरावर विपरित परिणाम होतो.
देवाच्या नामात अधिक सामर्थ्य असल्यानेच ‘राम से बडा राम का नाम ।’, असे म्हटले जाते. तिरुवल्लरू गावातील शेतकर्यांचे उदाहरण सर्वच भारतियांसाठी आदर्श ठरणारे आहे. नाम घेत तुळशीची शेती करणार्या शेतकर्यांवर विष्णुकृपा झालीच आहे, आता अविरत भगवंतकृपा अनुभवण्यासाठी उर्वरित भारतियांनीही भगवंताच्या अनुसंधानात रहावे !
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.