१. अनेक हिंदूंच्या घरी ‘भगवद़्गीता’ असूनही हिंदूंची स्थिती बिकट असणे
‘श्रीमद़्भगवद़्गीता’ हा ग्रंथ वेदांसह सर्व धर्मग्रंथांचे सारस्वरूप आहे. भगवद़्गीतेचा प्रसार सर्वच स्तरांतून होतो आणि अनेक हिंदूंच्या घरी हा ग्रंथ आहे; मात्र असे असूनही कलियुगात हिंदु धर्मीय आणि हिंदु धर्माची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
२. भगवद़्गीतेनुसार आचरण न करणारे जन्महिंदू !
समाजातील स्थिती पहाता लक्षात येते, ‘कुणी भगवद़्गीता पूजेत ठेवली आहे, कुणी कपाटात ठेवली आहे, तर कुणी तिचे पठण करत आहेत.’ फार अत्यल्प जण गीता समजून घेऊन समाजात भगवद़्गीतेचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करत आहेत; पण ‘साधनेच्या दृष्टीने कुणी गीतेचे अध्ययन करत आहेत का ?’, हा प्रश्न अनुत्तरितच आहे; कारण ज्यांच्या घरी गीता आहे, त्यांच्या साधनेची स्थिती किंवा घर, कुटुंब, समाज आणि राष्ट्र यासंबंधीचे त्यांचे कर्तव्यपालन किंवा आचार-विचार भगवद़्गीतेच्या कसोटीवर पडताळून पाहिले असता ‘अत्यल्प जीवात्मेच गीतेनुसार आचरण करत आहेत’, असेे लक्षात येते.
३. गीतेतील ज्ञानाचा लाभ हिंदु समाजाला करून देण्याचे दायित्व सर्वांवरच असणे
‘भगवद़्गीतेचा लाभ हिंदु बांधव घेत आहेत का ? लाभ घेत असतील, तर त्याचा परिणाम का दिसत नाही ? लाभ घेत नसतील, तर त्यामागील कारणे कुठली ? समाजाला भगवद़्गीतेचा लाभ कसा करून देता येईल ?’, याचा अभ्यास करण्याचे दायित्व सर्वांवर येते.
४. समाजाला भगवद़्गीता समजण्यास आणि आचरण्यास कठीण का वाटते ?
अ. बहुतांश समाजाला संस्कृत भाषा न येणे
आ. संस्कृत वाचता येणार्यांनी भगवद़्गीतेचा उपयोग केवळ पठणापुरता करणे
इ. संस्कृत वाचता येणार्यांना भगवद़्गीतेचा अर्थ न कळणे
ई. गीतेचा अर्थ कळणार्या अत्यल्प लोकांनाच साधनेची दृष्टी असणे
उ. योग्य गुरु न मिळाल्यामुळे गुरूंच्या मार्गदर्शनाचा अभाव असणे
ऊ. ‘कुठलाही धर्मग्रंथ हा केवळ वाचन किंवा पठण यांसाठी नसून तो प्रत्यक्ष श्री गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आचरणात आणून जीवनाचा उद्धार करण्याचा मार्ग आहे’, याविषयी अनभिज्ञता असणे
ए. ‘आम्ही हिंदु आहोत, आमच्या घरी भगवद़्गीता आहे’, असा अहंकार (वरील सर्व सूत्रे लागू असलेल्यांच्या संदर्भात) असणे.’
– (सद़्गुरु) डॉ. चारुदत्त प्रभाकर पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (जानेवारी २०२२)
संपादकीय भूमिकाहिंदूंनी भगवद़्गीतेनुसार आचरण केल्यास त्यांचे आणि धर्माचे पुनरुत्थान होऊन हिंदु पुन्हा गतवैभव प्राप्त करू शकतात ! |