कर्नाटकात बजरंग दलाच्या ३ कार्यकर्त्यांना हद्दपारीची नोटीस !

गोहत्या रोखण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ प्रयत्न करत असल्यामुळेच त्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे मत

मंगळुरू – शहरात अल्पसंख्य समाजातील एका मुलाला मारहाण करणे आणि होळीच्या कार्यक्रमाच्या वेळी मुसलमान तरुण-तरुणींनी सहभाग घेतल्यामुळे त्याला विरोध करणे या २ प्रकरणांत पोलिसांनी बजरंग दलाच्या ३ कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे. ‘तुम्हाला जिल्ह्यातून हद्दपार का करू नये’, असा प्रश्‍न नोटिसीत विचारण्यात आला आहे. या तिघांना पोलीस उपआयुक्तांच्या कार्यालयात उपस्थित राहून उत्तर देण्यास सांगितले आहे. त्यांच्या उत्तरानंतर पोलीस कार्यवाही करतील.

ही नोटीस बजावल्यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटना संतप्त झाल्या आहेत. अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या मते हिंदुत्वनिष्ठ पोलिसांना गोतस्करीविषयी माहिती देत असल्यामुळेच त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. बजरंगदलाचे प्रमुख पुनित अत्तावर म्हणाले, ‘‘आम्ही इतके दिवस पोलिसांना गोतस्करीविषयी माहिती देत होतो. यापुढे तसे करणार नाही. आम्हीच धडक कृती करू. गोतस्करीविषयी माहिती दिल्यामुळेच हद्दपारीची नोटीस मिळाली आहे. डोळ्यांदेखत कायदाद्रोही कृती घडत असतांना आम्ही गप्प बसायचे का ? गोहत्या निषेधाविषयी सरकारचा आदेशच आहे. पोलिसांना माहिती देऊनच गोहत्या थांबवल्यावर आम्हालाच नोटीस बजावण्यात आली आहे.’’

संपादकीय भूमिका 

  • कर्नाटकात हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार सत्तेवर असल्यामुळे हिंदुत्वनिष्ठांना अशा नोटिसी मिळाल्यास आश्‍चर्य ते काय ?
  • हिंदूंवर मर्दुमकी गाजवणारे पोलीस धर्मांधांसमोर झुकतात, हेच खरे !