गोवा : पर्यटक आणि ट्रेकर्स यांना दूधसागर धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास बंदी !

दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

(ट्रेकर्स म्हणजे डोंगर चढणारे)

निसर्गरम्य असा ‘दूधसागर धबधबा’ !

मडगाव, २२ जुलै (वार्ता.) – गेल्या काही दिवसांत दूधसागर येथील धबधब्याच्या पाण्यात पर्यटक वाहून गेल्याच्या, तसेच पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दूधसागर धबधब्याच्या ठिकाणी अनेक ट्रेकर्स येत असतात. गेल्या रविवारी अनुमती न दिल्याने येथे अनेक ट्रेकर्स अडकून पडले होते. या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना घडू नये; म्हणून दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी दूधसागर परिसरात जाण्यास पर्यटकांना बंदी केली आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अश्विन चंद्रू यांनी एका परिपत्रकाद्वारे खालील सूत्रे स्पष्ट केली आहेत.

 (सौजन्य : Prudent Media Goa)

१. दूधसागर धबधबा, दूधसागर रेल्वेस्थानक, दूधसागर धबधब्याजवळ असलेला रेल्वे पूल या ठिकाणी पर्यटक, ट्रेकर्स आणि इतर नागरिक यांना पूर्णपणे बंदी असेल. येथे पोलीस, रेल्वे कर्मचारी, वन कर्मचारी आणि कामावर असलेले सरकारी अधिकारी यांच्याविना कुणालाही जाता येणार नाही.

२. दूधसागर धबधब्याच्या पायथ्याशी असलेल्या निश्चित केलेल्या मार्गावरून जायला अनुमती असेल. येथे भेट देणार्‍यांना वन विभागाचे नियम आणि सुरक्षिततेचे सर्व नियम पाळावे लागतील.

३. कुळे, कॅसलरॉक, सोनावली आणि करंझोळ या चारही ठिकाणी तपासणी नाके उभारले जातील. येथे पोलीस, रेल्वे पोलीस, वन कर्मचारी असतील. येथून प्रवेश बंद असेल. या ठिकाणी दक्षिण-पश्चिम रेल्वेकडून सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील.

४. दक्षिण-पश्चिम रेल्वेकडून बॅरिकेडिंग (अडथळे उभारणे) केले जाईल. बंदीविषयीचे इंग्रजी, मराठी, कोकणी, कन्नड आणि हिंदी या भाषांतील फलक धबधब्यावर लावले जातील.

५. वरील नियमांचा भंग केल्यास किंवा कर्मचारी, सरकारी अधिकारी यांच्याशी वाद घातल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई केली जाईल.