मणीपूरमधील संतापजनक घटनेत जमावाने २ महिलांना विवस्त्र करून काढली धिंड !

  • २ मासांपूर्वीच्या या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर एकाला अटक

  • सामूहिक बलात्कार झाल्याचाही गुन्हा नोंद !

इंफाळ (मणीपूर) – गेल्या २ मासांपासून मणीपूरमध्ये हिंदु मैतेई समाज आणि ख्रिस्ती कुकी समाज यांच्यात हिंसाचार चालू आहे. आता या हिंसाचाराच्या संदर्भातील एक संतापजनक घटना समोर आली आहे. राज्यात २ महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली. तसेच त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचाही गुन्हा पोलिसांनी नोंदवला आहे. या प्रकरणात पोलिसांनी ३३ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. हेरम हेरा दास असे त्याचे नाव आहे. ‘येत्या काही घंट्यांतमध्ये आणखी काही आरोपींना अटक केली जाईल’, असे पोलिसांनी म्हटले आहे. ४ मे २०२३ या दिवशी मणीपूरमधील थौबाल जिल्ह्यात ही घटना घडली. यानंतर पोलिसांनी २५ दिवसांनी अज्ञातांच्या विरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा नोंदवला होता; मात्र आतापर्यंत कुणालाही अटक केली नव्हती. आता या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास चालू केले आहे. (इतके दिवस कारवाई न करणार्‍या पोलिसांवरच कारवाई करणे आवश्यक आहे ! – संपादक)

या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर सरकारने फेसबुक, ट्विटर आदी सामाजिक माध्यमांतून हा व्हिडिओ प्रसारित न करण्याचा आदेश दिला आहे. जर कुणी तो प्रसारित केला, तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

फाशीच्या शिक्षेच्या शक्यता पडताळू ! – मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह

मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणामुळे माझे मन प्रचंड दुखावले आहे. व्हिडिओ समोर येताच, राज्य सरकारने व्हिडिओची स्वतःहून नोंद घेतली आणि चौकशीचा आदेश दिला. पोलिसांनी कारवाई केली आणि आज सकाळी पहिली अटक केली. सध्या या प्रकरणाची कसून चौकशी चालू आहे. फाशीच्या शिक्षेच्या शक्यतेसह सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल याची आम्ही निश्‍चिती करू.

१४० कोटी देशवासीयांना मान खाली घालावी लागत आहे  ! – पंतप्रधान मोदी

या घटनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की,   माझे मन दुःख आणि राग यांनी भरले आहे. मणीपूरची जी घटना समोर आली ती कोणत्याही सभ्य समाजासाठी लज्जास्पद घटना आहे. हे पाप करणारे, गुन्हा करणारे किती आहेत, कोण आहेत हे बाजूला ठेवा; मात्र या घटनेने १४० कोटी देशवासीयांना मान खाली घालावी लागली आहे. मी सर्व मुख्यमंत्र्यांना आग्रह करतो की, त्यांनी त्यांच्या राज्यात कायदा सुव्यवस्था भक्कम करावी. आई-बहिणींच्या सुरक्षेसाठी कठोरात कठोर पावले उचलावीत. घटना राजस्थानची असो, छत्तीसगडची असो किंवा मणीपूरची असो, या देशात कोणत्याही भागात, कोणत्याही राज्यात राजकीय वादापलीकडे जाऊन कायदा सुव्यवस्था, महिलांचा सन्मान ठेवला पाहिजे. मी देशवासीयांना विश्‍वास देऊ इच्छितो की, कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही. कायदा पूर्ण शक्तीनिशी आणि कठोरपणे पावले उचलेल. मणीपूरच्या महिलांसमवेत जे झाले ते कधीही माफ केले जाऊ शकत नाही.

संपादकीय भूमिका

२ मासांपूर्वी ही घटना घडल्यानंतरही पोलिसांनी याविषयी काहीच कशी कारवाई केली नाही ?