भारतियांनो, क्रांतीकारकांच्‍या त्‍यागाचे मोल जाणा !

आज क्रांतीकारक बटुकेश्‍वर दत्त यांचा स्‍मृतीदिन आहे. त्‍या निमित्ताने विनम्र अभिवादन !

क्रांतीकारक बटुकेश्‍वर दत्त यांच्‍यासमवेत पत्नी आणि मुलगी

बटुकेश्‍वर दत्त यांनी वर्ष १९२९ मध्‍ये त्‍यांचे सहकारी भगतसिंह यांच्‍यासमवेत इंग्रजांच्‍या ‘सेंट्रल लेजिस्‍लेटिव एसेम्‍बली’त (संसदेत) बाँब फेकून ‘इन्‍कलाब जिंदाबाद’ या घोषणा दिल्‍या होत्‍या. ज्‍यामुळे बटुकेश्‍वर दत्त यांना आजन्‍म काळ्‍या पाण्‍याची शिक्षा स्‍वीकारावी लागली. भारताच्‍या स्‍वातंत्र्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार्‍यांपैकी एक बटुकेश्‍वर दत्त होते.

१. स्‍वातंत्र्यानंतरचे उपेक्षित जीवन

स्‍वातंत्र्यानंतर आणि कारागृहातून सुटल्‍यानंतर बटुकेश्‍वर दत्त हे पाटणा (बिहार) येथे राहू लागले. पाटणा येथे स्‍वतःची बस चालू करण्‍याच्‍या दृष्‍टीने अनुमती घेण्‍यासाठी पाटण्‍याच्‍या आयुक्‍तांना भेटल्‍यावर त्‍यांनी त्‍यांच्‍याकडे ते ‘बटुकेश्‍वर दत्त’ असल्‍याचा पुरावा मागितला. स्‍वातंत्र्यानंतर सरकारी उपेक्षेमुळे त्‍यांना हलाखीत जीवन व्‍यतीत करावे लागले. ज्‍या व्‍यक्‍तीच्‍या ऐतिहासिक कामगिरीचे प्रसंग मुलांच्‍या तोंडी असायला हवे होते, त्‍यांना एक साधारण ‘पर्यटक मार्गदर्शक’ (टुरिस्‍ट गाईड) बनून जीवन चालवावे लागले.

२. दत्त यांना रुग्‍णाईत असतांना मिळालेली वागणूक

बटुकेश्‍वर दत्त यांची पत्नी शाळेत नोकरी करत होती, ज्‍यावर त्‍यांचे घर चालत होते. जीवनाच्‍या अंत समयी वर्ष १९६४ मध्‍ये ते अचानक आजारी पडल्‍याने त्‍यांना गंभीर स्‍थितीत पाटणा येथील शासकीय रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले; परंतु तेथे त्‍यांच्‍यावर योग्‍य उपचार करण्‍यात येत नव्‍हते. यावर त्‍यांचे एक मित्र चमनलाल आझाद यांनी एका लेखात लिहिले, ‘बटुकेश्‍वर दत्त यांच्‍यासारख्‍या क्रांतीकारकांना भारतात जन्‍म घ्‍यायला हवा होता का ? परमात्‍म्‍याने एवढ्या महान शूरविरांना आपल्‍या देशात जन्‍म देऊन चूक केली आहे.’

चमनलाल यांचा मार्मिक आणि कटू सत्‍याला वाचा फोडणारा लेख वाचून पंजाब सरकारने स्‍वखर्चाने दत्त यांच्‍यावर उपचार करण्‍याचा प्रस्‍ताव दिल्‍यानंतर बिहार सरकारने लक्ष घालून वैद्यकीय महाविद्यालयात त्‍यांच्‍यावर उपचार चालू केले. दत्त यांची प्रकृती गंभीर होत चालली होती. २२.११.१९६४ या दिवशी त्‍यांना देहली येथे नेण्‍यात आले. तेथे त्‍यांना कर्करोग झाल्‍याचे निदान झाले.

३. भगतसिंह यांच्‍या समाधीशेजारी स्‍वतःचे अंत्‍यसंस्‍कार करण्‍याची व्‍यक्‍त केलेली इच्‍छा

त्‍या वेळी पंजाबमधील मुख्‍यमंत्री रामकिशन हे दत्त यांना भेटायला गेले आणि त्‍यांनी विचारले, ‘‘मी तुम्‍हाला काही देऊ इच्‍छितो. तुमची जी काही इच्‍छा आहे, ते मागा.’’ त्‍यावर अश्रूपूर्ण नयनांनी त्‍यांनी सांगितले, ‘‘मला काही नको. केवळ माझी शेवटची इच्‍छा आहे की, माझा अंत्‍यसंस्‍कार माझा मित्र भगतसिंह याच्‍या समाधीच्‍या शेजारी व्‍हावा.’’

२० जुलै १९६५ च्‍या रात्री १ वाजून ५० मिनिटांनी दत्त यांचे निधन झाले. त्‍यांच्‍या इच्‍छेनुसार भारत-पाक सीमेजवळ हुसैनीवाला येथे भगतसिंह यांच्‍या समाधीजवळ भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्‍या समाधीजवळ त्‍यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले.

४. क्रांतीकारकांना स्‍वातंत्र्यानंतर  उपेक्षित जगावे लागले, याला दोषी कोण ?

वरील प्रसंग प्रत्‍येक भारतियाला ज्ञात झाला पाहिजे आणि आपण चिंतन करायला हवे की, अशा अनेक युवकांनी त्‍यांचे तारुण्‍य, सुखसुविधा, कुटुंब यांवर पाणी सोडून स्‍वातंत्र्यासाठी संघर्ष करत बलीदान दिले. त्‍यांच्‍यातील काही जणांनाच भाग्‍याने स्‍वातंत्र्य पहायला मिळाले. तिथेही त्‍यांना कष्‍ट भोगावे लागले, याला दोषी कोण ? त्‍यांना आपण आज ‘अज्ञात’ म्‍हणतो; परंतु वृत्तपत्रांची पाने ‘ते अज्ञात नाहीत’, याचा पुरावा देतात. त्‍या काळी रेडिओवर त्‍यांच्‍या कर्तृत्‍वाच्‍या बातम्‍या सांगितल्‍या जात. शहरांमध्‍ये त्‍यांचे भीत्तीपत्रक लागत. त्‍यांच्‍या गुप्‍तवार्ता देणार्‍यांना मोठ्या रकमेचे आमीष दाखवून कारवाया केल्‍या जात, मग नंतर ते अज्ञात कसे झाले ? भगतसिंह यांच्‍या समवेत बाँब फेकणारे बटुकेश्‍वर दत्त यांना काळ्‍या पाण्‍याची म्‍हणजे मृत्‍यूदंडापेक्षाही अधिक दुःखदायी शिक्षा देण्‍यात आली होती.

(साभार : श्री. कुमार एस्. यांच्‍या फेसबुक पानावरून)