मेरठ (उत्तरप्रदेश) येथे विजेचा धक्का लागल्याने ५ कावड यात्रेकरूंचा मृत्यू, तर १६ जण घायाळ

विद्युत् विभागाच्या अधिकार्‍यांच्या निष्काळीपणामुळे घटना घडल्याचा आरोप

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथे कावड यात्रेकरूंवर उच्च क्षमतेच्या वीजवाहिनीद्वारे विजेचा धक्का लागल्याने ५ कावड यात्रेकरूंचा मृत्यू झाला, तर १६ जण घायाळ झाले. या अपघातानंतर विद्युत् विभागाच्या अधिकार्‍यांवर निष्काळजीपणाचा आरोप होत आहे.

या घटनेनंतर संतप्त कावड्यांनी घटनास्थळी रस्ता बंद आंदोलन केले. ही घटना भावनापूर पोलीस ठाण्याच्या चौहान भागात घडली. येथे डीजे (मोठी संगीत यंत्रणा) वाजवत कावड यात्रेकरू हरिद्वारहून गंगाजल घेऊन येत होते. या गावात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी वीजवाहिनीमधील विद्युत् प्रवाह बंद करण्यास सांगितले; मात्र त्याकडे अधिकार्‍यांकडून दुर्लक्ष केल्यामुळे डीजे या विद्युत वाहिनीला धडकली आणि कावडे यात्रेकरूंना विजेचा धक्का लागला आणि ५ कावड्यांचा जागीच मृत्यू झाला.

संपादकीय भूमिका

अशा अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !