१५ दिवसांत स्थिती न सुधारल्यास पुन्हा आंदोलन करण्याची चेतावणी
सावंतवाडी – शहरातील बसस्थानकाच्या दुरवस्थेच्या विरोधात १४ जुलै या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. या वेळी संपूर्ण बसस्थानकाची दिवसभरात किमान २ वेळा स्वच्छता करावी, आसन व्यवस्था दुरुस्त करावी, रात्रीच्या वेळी बसस्थानकात पुरेसा प्रकाश असावा, येथील आगारातील शेडची दुरुस्ती करावी, कर्मचार्यांना येणार्या अडचणी त्वरित दूर कराव्यात, बसस्थानकातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, सेवेत असलेल्या पोलिसांसाठी कक्ष, हिरकणी कक्ष उभारावेत आदी मागण्या करण्यात आल्या. (बसस्थानकाची एवढी दुरवस्था झाल्याचे एस्.टी. महामंडळाला अन्य कुणीतरी का दाखवून द्यावे लागते ? महामंडळ काय करत आहे ? – संपादक) बसस्थानकात सुधारणा करण्याविषयी प्रशासनात असलेल्या अनास्थेसह ढिसाळ कारभाराचा या वेळी निषेध करण्यात आला. येत्या १५ दिवसांत बसस्थानकाची स्थिती सुधारली नाही, तर बसस्थानकामध्ये ‘चक्काजाम’ आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी देण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष असिफ शेख, तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्यासह वेंगुर्ला तालुकाध्यक्ष, तालुका सरचिटणीस, चराठा ग्रामपंचायत सदस्य गौरी गावडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
हे ही वाचा –
♦ सिंधुदुर्ग : सावंतवाडी बसस्थानकाचे काम अनेक वर्षे अपूर्ण असल्याने प्रवासी आणि कर्मचारी यांची असुविधा
https://sanatanprabhat.org/marathi/676355.html