अमेरिकेतील हिंदूंना संरक्षण द्या! – अमेरिकेतील खासदारांची मागणी  

अमेरिकेसाठी हिंदु समाजाचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचा उल्लेक करत केले कौतुक !

खासदार हँक जॉनसन

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेसह पाश्‍चात्त्य देशांमध्ये हिंदूंप्रतीच्या द्वेषाच्या घटनांत वाढ झाली आहे. हिंदू आणि त्यांची संपत्ती यांना लक्ष्य केले जात आहे. या संदर्भात हिंदूंच्या संघटनेने अमेरिकेतील कॅपिटल हिल येथे ‘नॅशनल हिंदू एडव्होकेसी डे ऑन द हिल’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार आणि अन्य अमेरिकी खासदार सहभागी झाले होते. या खासदारांकडून हिंदूंच्या संरक्षणाची मागणी करण्यात आली. भारतीय वंशाचे खासदार श्री ठाणेदार यांच्यासह खासदार रिच मॅककोर्मिक, बडी कार्टर, थॉमस कीन, हँक जॉनसन आदी उपस्थित होते. या वेळी खासदार रिच मॅककोर्मिक म्हणाले की, अमेरिका देश आणि समाज यांच्यासाठी हिंदु समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

१. खासदार श्री ठाणेदार म्हणाले की, मी हिंदूंच्या समर्थनार्थ येथे आलो आहे. प्रत्येक व्यक्तीने द्वेष, कट्टरता, कुणावर आक्रमण करणे आदी गोष्टी त्यागायला हव्यात. प्रत्येकाला स्वतःच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे.

२. अमेरिकेतील अन्वेषण यंत्रणा एफ.्बी.आय.च्या वर्ष २०२० च्या आकडेवारीनुसार अमेरिकेत भारतियांच्या विरोधातील द्वेषाचे गुन्हे ५०० टक्क्यांनी वाढले आहेत. अमेरिकेत हिंदूंची लोकसंख्या २२ लाखांहून अधिक आहे.