केवळ स्‍वयंपाकघर नव्‍हे, हे तर एक औषधालयच !

एक-दोन दिवसांत घरगुती उपचारांचा परिणाम आपल्‍याला न दिसल्‍यास केवळ त्‍यांवर अवलंबून न रहाता वैद्यांचा योग्‍य समादेश (सल्ला) घेणे आवश्‍यक आहे.

आपण जे अन्‍नग्रहण करतो, त्‍या अन्‍नामध्‍ये जे जे घटक मिसळलेले असतात, त्‍यात कोणता ना कोणता औषधी उपयोग नक्‍कीच असतो; म्‍हणूनच आपली भारतीय पाककला ही आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने सर्वश्रेष्‍ठ आहे. हे घटक कोणते आणि त्‍यांचा औषधी उपयोग कसा करायचा ? हे आपण आजच्‍या लेखांमध्‍ये समजून घेणार आहोत. या माहितीचा उपयोग किरकोळ आरोग्‍याच्‍या तक्रारीवर घरच्‍या घरी सोपे इलाज करण्‍यासाठी आपण करू शकतो. उदाहरण सांगायचे झाल्‍यास एका रुग्‍ण महिलेचा मला रात्री भ्रमणभाष आला, ‘‘मला उद्या व्‍याख्‍यान द्यायचे आहे; पण सारखा खोकला येत आहे. काय करू ?’’ मी त्‍यांना औषध सांगितले; परंतु रात्री उशिरा ते औषध उपलब्‍ध होणे शक्‍य नव्‍हते. घरातील लवंग बारीक कुटून मधासह घेण्‍यास त्‍यांना सांगितले. त्‍यांचा खोकला न्‍यून होऊन त्‍यांना व्‍याख्‍यान देता आले. घसा दुखत असल्‍यास हळद-दूध पिणे, सर्दी झाल्‍यास वेखंडचा लेप कपाळावर लावणे, असे घरगुती उपचार आपण ऐकले किंवा वाचले असतील. किरकोळ आरोग्‍याच्‍या तक्रारींवर घरगुती उपचार करण्‍यास हरकत नसते; परंतु सर्वांनी महत्त्वाची गोष्‍ट लक्षात घ्‍यावी की, एखाद्या व्‍यक्‍तीला गंभीर आजार असल्‍यास तिने पूर्णपणे घरगुती उपचारांवर अवलंबून रहाणे चुकीचे आहे. हे उपचार प्राथमिक स्‍वरूपाचे आहेत. या माहितीचा तारतम्‍याने उपयोग आपण विकार निर्मूलनासाठी करावा. पुढे येणार्‍या आपत्‍काळ्‍याच्‍या दृष्‍टीने साधकांना या माहितीचा उपयोग व्‍हावा, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !

आपण मागच्‍या एका लेखात वाचले होते की, वात, पित्त आणि कफ यांचे विशिष्‍ट गुणधर्म आहेत. त्‍यांच्‍यासारखेच गुण ज्‍या पदार्थात असतील, तो पदार्थ त्‍या दोषाला वाढवतात, उदा. वात हा शीत (थंड) गुणाचा आहे आणि थंड हवेच्‍या संपर्कात सातत्‍याने राहिल्‍यास शरिरात वात वाढून तो वेदना उत्‍पन्‍न करतो. त्‍यावर मालिश आणि शेकणे हे उपचार केल्‍यास तो न्‍यून होऊन वेदनाही न्‍यून होतात, म्‍हणजे विरुद्ध गुणाचे उपचार केले, तर वाढलेले दोष न्‍यून होतात. प्रत्‍येक पदार्थ कोणत्‍या गुणधर्माचा आहे ? नेमका तो शरिरात कोणत्‍या दोषावर कार्य करतो ? हे विस्‍तारभयाच्‍या दृष्‍टीने, तसेच समजून घेण्‍यास किचकट आहे; म्‍हणून ते पदार्थ कोणत्‍या आरोग्‍याच्‍या तक्रारींवर उपयुक्‍त आहेत ? एवढेच आपण येथे समजून घेणार आहोत.

प्रत्‍येक गृहिणी मसाल्‍याचा डबा स्‍वयंपाकघरात ठेवते. फोडणी घालतांना डब्‍यातील जिरे, मोहरी, हळद, हिंग असे सर्व एकत्र जिन्‍नस या डब्‍यात असतात. त्‍याचेच औषधी उपयोग आज आपण समजून घेऊया.

वैद्या (सौ.) मुक्‍ता लोटलीकर

१. मोहरी

अ. मोहरी ही उष्‍ण गुणाची आहे. त्‍यामुळे कोणत्‍याही अवयवात वेदना असल्‍यास मोहरीचे तेल वेदना न्‍यून करते.

आ. कफ प्रकृतीच्‍या व्‍यक्‍तींनी बळ वाढण्‍यासाठी मोहरीचे तेल अंगाला चोळावे. (प्रकृती कशी ओळखायची ? याविषयीचा लेख २८ मार्च २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेला आहे.)

इ. दात किडल्‍याने दुखत असेल, तर मोहरी बारीक करून पेला भर पाण्‍यात पाव चमचा मोहरीची पूड उकळावी आणि अर्धा पेला पाणी शेष राहील इथपर्यंत उकळावे. हे पाणी कोमट झाल्‍यावर त्‍याने गुळण्‍या कराव्‍यात. याने वेदनेपासून आराम मिळतो. (दात किडल्‍यास दंत वैद्यांचा सल्ला अवश्‍य घ्‍यावा.)

ई. मोहरीच्‍या अतिवापरामुळे पित्त विकार होतात; पण प्रमाणात खाल्‍ल्‍यास ती जठराग्‍नी वाढवण्‍याचे उत्तम कार्य करते. (म्‍हणूनच आपल्‍याकडे फोडणीत योग्‍य प्रमाणात याचा वापर होतो.)

उ. थंड प्रदेशात (उत्तर भारतात) मोहरीचा वापर मुबलक प्रमाणात होतो. (‘सरसो का साग’, मोहरीचे तेल घालून केलेले लोणचे इत्‍यादी). त्‍याचे कारण आपल्‍याला मोहरीच्‍या वरील गुणधर्मामुळे लक्षात आले असेलच; परंतु उष्‍ण कटिबंधात रहाणार्‍या लोकांनी ‘सरसो का साग’ किंवा तत्‍सम लोणची खाल्‍ल्‍यास त्रास होतो. यावरून प्रदेशानुसारही काय खावे ? हे आपल्‍याला लक्षात येईल.

२. जिरे

अ. तोंड आले असल्‍यास जिरे थोडेसे चावून चघळावे. जिर्‍यांमध्‍ये असलेल्‍या तेलामुळे तोंडात आलेले फोड न्‍यून होतात; परंतु वारंवार तोंड येत असेल, तर वैद्यकीय सल्ला अवश्‍य घ्‍यावा.

आ. भूक न लागणे, पोट फुगणे, तोंडाला चव नसणे, वारंवार अपचन होणे यांवर साधा उपाय म्‍हणजे जेवणानंतर पाव चमचा जिरे चावून खाणे. त्‍यावर थोडे कोमट पाणी प्‍यावे.

इ. बाळंतिणीला पाव चमचा जिर्‍याचे चूर्ण आणि अर्धा चमचा गूळ असे प्रतिदिन खायला दिल्‍यास दुधाचे प्रमाण वाढते.

ई. उलटी होत असल्‍यास त्‍या वेळीही पाव चमचा जिर्‍याचे चूर्ण कोमट पाण्‍यातून घेतल्‍यास आराम मिळतो.

३. हिंग

अ. हिंग हा झाडाचा चिक आहे. हिंग उष्‍ण गुणधर्माचा आहे. लहान मुलांचे पोट फुगल्‍यास त्‍यावर हिंगाचा लेप केल्‍यास आराम मिळतो.

आ. अजीर्ण (अपचन) झाले असल्‍यास चमचाभर तूपासह चिमूटभर हिंग खावा.

इ. जखम भरण्‍यासाठी कडुलिंबाची पाने आणि हिंग यांचे मिश्रण (चटणीसारखे) बारीक करून जखमेवर लावावे. जखम भरून येते.

ई. मळमळणे, उलटी होणे, दीर्घकाळ पोटात दुखणे यांवर हिंग, सैंधव आणि जिरे पूड प्रत्‍येकी चिमूटभर घेऊन ते चमचाभर तूप अन् अर्धा चमचा मध यांसमवेत घ्‍यावे.

उ. हिंग उष्‍ण गुणधर्माचा असल्‍याने पित्त प्रकृतीच्‍या व्‍यक्‍तीने, मायग्रेन (डोकेदुखीचा प्रकार), तसेच यकृताचे विकार असलेल्‍या व्‍यक्‍तींनी त्‍याचा वापर अगदी अल्‍प प्रमाणात करायला हवा.

४. हळद

अ. हळदीचे औषधी उपयोग आपल्‍या सर्वांना बर्‍यापैकी माहिती आहेतच. हळद बहुगुणी आणि विविध विकारांवर औषधी म्‍हणून वापरली जाते. हळद गुणाने उष्‍ण असली, तरी पित्त वाढवत नाही.

आ. सर्दी, खोकला, घसा बसणे यात पाव चमचा हळदीचे चूर्ण मधाबरोबर चाटावे. तसेच दुधातून देखील हळद घेऊ शकतो.

इ. तोंड आले असल्‍यास हळदीच्‍या काढ्याने गुळण्‍या कराव्‍यात. यामुळे तोंड आलेले न्‍यून होतेच, तसेच मुख दुर्गंधी सुद्धा न्‍यून होते.

ई. अंगाला खाज येणे किंवा त्‍वचाविकार यांत हळद आणि कडुलिंब यांचे मिश्रण (चटणीसारखे) करून त्‍याचा लेप केल्‍यास आराम मिळतो.

उ. मार लागलेल्‍या जागी हळदीचा लेप लावावा. पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गूळ हे मिश्रण पोटातून घ्‍यावे.

ऊ. मूळव्‍याधीवर गायीच्‍या तुपात हळकुंड उगाळून मोडांना लेपन करावे.

ए. त्‍वचेचा वर्ण हळदीमुळे सुधारत असल्‍याने उटणे आणि मलम यांत हळद वापरतात. डाळीच्‍या पिठामध्‍ये चिमूटभर हळद घालून दुधात मिसळून त्‍याचा लेप चेहर्‍यावर केल्‍यास त्‍वचा सतेज होते.

ऐ. पाय मुरगळून सूज आल्‍यास हळकुंड पाण्‍यात उगाळून ती गरम करून सुजेवर लावावी.

(क्रमशः पुढच्‍या बुधवारी)

– वैद्या (सौ.) मुक्‍ता लोटलीकर, पुणे (१०.७.२०२३)