छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्याच्या नामांतराच्या सूत्रावरून जिल्हाधिकारी यांनी महत्त्वाचे आदेश काढले आहेत. सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनी तूर्तास औरंगाबाद विभाग, जिल्हा, उपविभाग, तालुका आणि गाव यांच्या नावात कोणताही पालट करू नये, असे आदेश येथील जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी ४ जुलै २०२३ या दिवशी दिले आहेत. शहराच्या नामांतराच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयातील याचिकांच्या सुनावणीच्या वेळी शासनाच्या वतीने २० एप्रिल २०२३ या दिवशी करण्यात आलेले निवदेन, तसेच ३ मे २०२३ या दिवशीच्या न्यायालयीन आदेशाच्या अनुषंगाने पाण्डेय यांनी हे आदेश काढले आहेत. त्यामुळे यापुढे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांत ‘औरंगाबाद’ असाच उल्लेख करावा लागणार आहे.
महसूल आणि वन विभागाने २४ फेब्रुवारी २०२३ या दिवशी प्रारूप अधिसूचना काढून ‘औरंगाबाद’ जिल्ह्याचे नामकरण ‘छत्रपती संभाजीनगर’ असे केले आहे. या अधिसूचनेस विरोध करत औरंगाबाद येथील सय्यद मोईनोद्दीन इनामदार, मुजाहिद हुसैनी, शेख सिकंदर, अंजारोद्दीने कादरी (पैठण), ताहा पटेल, मोहसीन खान आणि इतरांनी अधिवक्ता सईद एस्. शेख यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका प्रविष्ट केल्या आहेत, तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने शहराचा उल्लेख ‘औरंगाबाद’ असाच करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. त्यानुसार शासकीय पातळीवर सध्या ‘औरंगाबाद’ असाच उल्लेख करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.