धर्माचे रक्षण, धर्माचरण या कृती आपल्‍या घरापासूनच कराव्‍या लागतील ! – अधिवक्‍ता अभिषेक भगत

अहिल्‍यानगर येथे गुरुपौर्णिमा महोत्‍सव

अहिल्‍यानगर येथील गुरुपौर्णिमेला उपस्‍थित जिज्ञासू

अहिल्‍यानगर- हिंदु धर्म घडवायचा असेल, तर प्रत्‍येकाला प्रथम आपले कुटुंब घडवावे लागेल. धर्माचे रक्षण, धर्माचरण या कृती आपल्‍या घरापासूनच कराव्‍या लागतील. आपले आचार-विचार चांगले ठेवण्‍याचे काम धर्म-अध्‍यात्‍म करते. रामायण, महाभारत या काळापासून गुरु-शिष्‍य परंपरा आपल्‍याला अवगत आहे. याचसमवेत सध्‍याच्‍या काळात धर्मावर होणारे आघात, हिंदु मुलींची हत्‍या, लव्‍ह जिहाद असे प्रकार सर्वत्र पहायला मिळतात. यासाठी प्रत्‍येकाने स्‍वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्‍यक आहे, असे मार्गदर्शन नगर येथील अधिवक्‍ता अभिषेक भगत यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्‍सवात ते बोलत होते. ऋग्‍वेद भवन चितळे रोड, नगर याठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्‍सव भावपूर्ण वातावरणात संपन्‍न झाला. हिंदु जनजागृती समितीच्‍या कु. प्रतीक्षा कोरगावकर यांचेही या वेळी मार्गदर्शन झाले.

महोत्‍सवाच्‍या प्रारंभी श्री व्‍यासपूजा आणि प.पू. भक्‍तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्‍यात आले. या वेळी स्‍वसंरक्षण प्रात्‍यक्षिके दाखवण्‍यात आली. शेवटी सर्वांनी हिंदु राष्‍ट्र स्‍थापण्‍याच्‍या कार्यात सहभागी होण्‍याची शपथ घेतली. या कार्यक्रमाला ‘सिद्धेश्‍वर मंदिर ट्रस्‍ट’चे उपाध्‍यक्ष श्री. अभिमन्‍यू जाधव, समर्थ मंडळ ऋग्‍वेद भवन ट्रस्‍ट अध्‍यक्ष श्री. सुरेश क्षीरसागर, शिवसेना नगरसेविका सौ. सुवर्णा गेनप्‍पा, भाजप महिला आघाडीच्‍या सौ. सुरेखा विद्दे आदी मान्‍यवरांसह जिज्ञासू उपस्‍थित होते. श्रीरामपूर या ठिकाणीही गुरुपौर्णिमा मोठ्या उत्‍साहात साजरी करण्‍यात आली.