चीनमध्ये घरात छुपे चर्च चालवणार्‍या ख्रिस्ती दांपत्याला दंड !

बीजिंग (चीन) – घरात छुपे चर्च चालवल्याच्या प्रकरणी चीन सरकारने एका ख्रिस्ती दांपत्याला ४ लाख युआन (४५ लाख ५३ सहस्र ४७४ रुपये) इतका प्रचंड दंड ठोठावला. ख्रिस्ती धर्मप्रचारक यांग जिबो आणि वांग जिओफी अशी त्यांची नावे आहेत. चीनमधील ख्रिस्त्यांवरील दडपशाहीवर लक्ष ठेवणार्‍या टेक्सास येथील एका सामाजिक संस्थेने चीनचे हे कृत्य उघडकीस आणले.

चीनच्या अग्नेय दिशेला असलेल्या जियामेन या बंदरावर वरील दांपत्य स्वतःच्याच घरात झुनसाईडिंग नावाचे चर्च चालवत होते. हे चर्च या प्रांतातील सर्वांत मोठे चर्च मानले जाते. या चर्चची चीन सरकारकडे कुठलीही नोंद नसल्याने सरकारने वर्ष २०२१ मध्ये या दांपत्याला २ लाख युआन (२२ लाख ७६ सहस्र ७३७ रुपये) दंड ठोठावला होता. तो २८ जून २०२३ या दिवशी दुप्पट, म्हणजे ४ लाख युआन इतका केला. हा दंड भरण्यास या दांपत्याने नकार दिला आहे.

चीनने मे २०१९ मध्येही एका चर्चला २५ सहस्र युआन (२ लाख ८४ सहस्र ५९२ रुपये) दंड ठोठावला होता.

संपादकीय भूमिका

भारतात अल्पसंख्यांकांच्या धार्मिक अधिकारांची गळचेपी होत असल्याची ओरड करणारे आता गप्प का ?