गोव्यात पावसाची विक्रमी नोंद

पणजी आणि दाबोळी केंद्रांत २४ घंट्यांत सुमारे ८ इंच पावसाची नोंद

पणजीमध्ये मुसळधार पाऊस

पणजी, २८ जून (वार्ता.) – गोव्यात मागील २४ घंट्यांत पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. पणजी येथे मागील २४ घंट्यांत (२७ जूनला सकाळी ८.३० ते २८ जूनला सकाळी ८.३० या कालावधीत) २०२.९ मी.मी., तर दाबोळी (मुरगाव तालुका) येथे १९३.४ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गोव्यात जून मासात यंदा पडलेला पाऊस हा मागील ५० वर्षांतील १० वा सर्वाधिक पाऊस आहे. संपूर्ण गोव्यात २४ घंट्यांमध्ये सरासरी १४६ मी.मी. पाऊस पडला आणि यामुळे पावसाची जून मासातील तूट अल्प होऊन ती ३८.६ टक्क्यांवर आली आहे.

पावसाची हवामान विभागाच्या केंद्रांनुसार नोंद

म्हापसा – १८४ मी.मी., मुरगाव – १७९.२ मी.मी., सांखळी – १६५.६ मी.मी., एला (जुने गोवे) – १६४ मी.मी., पेडणे – १५१.४ मी.मी., मडगाव – ११८.६ मी.मी., काणकोण – ११७ मी.मी., केपे – ११० मी.मी., वाळपई – १०७.८ मी.मी., फोंडा – ९० मी.मी. आणि सांगे – ८४.९ मी.मी.

पहिल्याच पावसात ‘स्मार्ट सिटी’ पणजी शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली

२७ जून या दिवशी काही घंटे पडलेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. सर्वाधिक फटका ‘१८ जून’ या रस्त्याला बसला.

या रस्त्यावर रात्रीपर्यंत गुडघाभर पाणी साचले आणि यामुळे रस्त्याच्या बाजूने अनेक दुकाने अन् घरे यांमध्ये पाणी गेले. एम्.जी. रस्ता, पणजी बसस्थानकाजवळील रस्ता आणि अन्य काही ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे पणजीवासियांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. ‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली पणजी शहरात शेकडो कोटी रुपयांचे काम करण्यात आले; मात्र या कामामुळे पणजीवासियांच्या समस्यांमध्ये वाढ झाली’, अशा सार्वत्रिक प्रतिक्रिया उमटल्या.

पुढील २ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

हवामान खात्याने २९ जून आणि ३० जून या दिवशी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.