वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव षष्ठम दिवस : मान्यवरांचे विचार
रामनाथी, २२ जून (वार्ता.) – ‘जम्बूद्वीपे भरतखण्डे आर्यावर्ते भारतवर्षे, एक नगरी है विख्यात अयोध्या नाम की…’ हे गीत ऐकल्यानंतरही आपण केवळ अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, भूतान, नेपाळ एवढीच मागणी का करतो ? जर जम्बूदीपची संरचना एवढी मोठी आहे, ज्यात आजचे चीन, रशिया आणि मध्य पूर्वेतील सर्व देश सहभागी आहेत, तर आपण काहीतरी मोठी मागणी केली पाहिजे, असे मत जयपूर, राजस्थान येथील ‘जम्बू टॉक्स’ या ‘यू-ट्युब वाहिनी’चे संचालक श्री. निधीश गोयल यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये ६ व्या दिवशी (२२.६.२०२३ या दिवशी) व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, ‘‘सध्याच्या चीनमध्ये मेरू (सुमेरू) पर्वत आहे आणि तो या विश्वाचा मध्य आहे’, असे म्हटले जाते. ही गोष्ट हिंदूंना किती वेळा सांगितली गेली ? आमच्या वाहिनीने ‘क्यों छिपाया जम्बूद्वीप ?’ असा कार्यक्रम केला. आपण अखंड भारताची गोष्ट का करतो ? जम्बू द्वीपाविषयी का बोलत नाही ? आपण काश्मीरला महर्षि कश्यप यांची भूमी म्हणतो, तर ‘कॅस्पियन’ समुद्राला कश्यप सागर का नाही म्हणत ? हा तोच कश्यप समुद्र आहे, जेथून पुढे मध्य पूर्व आणि अन्य देश आहेत. जम्बूद्वीपविषयी आम्ही केलेला कार्यक्रम २ लाख लोकांनी पाहिला. यावरून भारताच्या युवकांना आपल्या इतिहासाविषयी जिज्ञासा आहे, हे लक्षात आले. युवकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधला पाहिजे. आदि शंकराचार्यांनी म्हटले होते की, मी शंख वाजवणार आहे आणि हा शंखध्वनी जेथे जेथे पोहोचेल, तो प्रदेश सनातन राहील. भारत कधीही गुलाम राहिलेला नाही, उलट आपला समाज संघर्षशील राहिला आहे. असे असले, तरी आपल्याला ‘भारत गुलाम देश होता’, असे शिकवण्यात आले आणि आपण ते मान्य केले. अर्जुन दिग्विजयी मोहिमेवर निघाला होता. तो आजच्या सायबेरियापर्यंतही गेला होता. मग आपल्याला हिंदु संस्कृतीच्या दृष्टीकोनातून भौगोलिक इतिहास शिकवण्यापासून कोणी थांबवले आहे ? आम्ही जेव्हापासून ‘जम्बू टॉक्स’ ही वाहिनी चालू केली, तेव्हापासून आम्ही केवळ अशा विषयांवर २०० कार्यक्रम केले. यासह अन्य विषय मिळून आतापर्यंत ७०० भाग केले आहेत. आमचा हा प्रवास थांबणार नसून सतत चालू रहाणार आहे. कोणत्याही कार्याचा प्रारंभ सात्त्विक भावाने केल्यास आपल्या आतील आणि चराचरातील श्रीकृष्ण साहाय्य करतो. भगवंताचे साहाय्य लाभल्यास आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही.’’