धर्मशिक्षण, धर्मजागृती आणि धर्मरक्षण यांसाठी संस्कृत भाषा उपयुक्त ! – डॉ. अजित चौधरी, प्राचार्य, यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक, बीड


रामनाथी, २१ जून (वार्ता.) – हा देश अनादी काळापासून हिंदु राष्ट्र होता आणि पुढेही हिंदु राष्ट्र असेल. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मशिक्षण, धर्मजागृती आणि धर्मरक्षण यांसाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी संस्कृत भाषेशिवाय पर्याय नाही. आपल्या संस्कृतीमध्ये सर्व धर्मशिक्षण हे संस्कृत भाषेमध्ये आहे. ते जाणून घेण्यासाठी संस्कृत भाषा जाणून घेणे आवश्यक आहे. परिणामकारक धर्मजागृती करण्यासाठी हिंदु धर्माचे स्वरूप जाणून घेतले पाहिजे. त्यासाठीही संस्कृत भाषा आली पाहिजे. तसेच धर्मावरील आघात परतवून लावण्यासाठीही संस्कृत भाषाच उपयुक्त ठरते, हे श्रीरामजन्मभूमी खटल्याने दाखवून दिले. श्रीरामजन्मभूमी ही प्रभु श्रीरामाचीच आहे, हे सिद्ध करण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयासमोर आपल्या अधिवक्त्यांना संस्कृतमधील धर्मग्रंथांचेच पुरावे सादर करावे लागले होते, असे मत बीड येथील यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. अजित चौधरी यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या ६ व्या दिवशी (२१.६.२०२३ या दिवशी) व्यक्त केले.

डॉ. अजित चौधरी,  प्राचार्य यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक  बीड

ते पुढे म्हणाले, ‘‘जगभरात कुठेही रहाणार्‍या हिंदूंमध्ये संस्कृतचाच संचार आहे. आपल्या धर्माचरणातील संस्कार संस्कृतमध्ये आहेत. आपल्या दिवसाचा प्रारंभ आणि अंतही संस्कृत श्लोकानेच होतो. मेकॉले शिक्षणपद्धतीने आपल्याला संस्कृत भाषेपासून वेगळे केले असले, तरी आजही ही देवभाषा आपल्या जीवनाचे अभिन्न आहे. आज विविध संशोधकांकडून संस्कृत ही संगणकाच्या ‘प्रोसेसिंग’साठी सर्वथा योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. आपले प्राचीन मंदिरे केवळ प्रार्थनास्थळे नव्हती, तर ते शिक्षण आणि तंत्रज्ञान यांचीही केंद्रे होती. सहस्रो वर्षांपूर्वी आपल्या ऋषिमुनींनी संस्कृत भाषेमध्ये अनेक शोध लिहून ठेवले आहेत. अशा सर्वार्थाने आदर्श देववाणी संस्कृतला व्यावहारिक भाषा करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे; म्हणून प्रत्येक कुटुंबाने त्यांच्या मुलांना लहानपणापासून इंग्रजी नाही, तर संस्कृत भाषा शिकवणे आवश्यक आहे.’’