पुणे – अरुंद घाटरस्ता, वारंवार कोसळणार्या दरडी, अपुरे चार्जिंग स्टेशन, अपुरी बससंख्या, सातत्याने होणारे अपघात या समस्यांमुळे सिंहगड ‘ई-बस’ बंद करण्यात आली होती. गेल्या सप्ताहामध्ये वनविभाग आणि पी.एम्.पी.एम्.एल्. प्रशासनाची संयुक्त बैठक झाली होती. त्यानुसार पी.एम्.पी.एम्.एल्.चे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी संपूर्ण रस्त्याची पहाणी केली असून पायाभूत सुविधांच्या उभारणी नंतरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती दिली आहे. पूर्वी ९ मीटर लांबीची बस होती. आता ७ मीटर लांबीची बस असेल, असेही बकोरिया यांनी सांगितले.
‘महाविकास’ आघाडी सरकारने सिंहगडावर ‘ई-बस’ चालू करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा चार्जिंग ठिकाण, डोणजे येथे वाहनतळ उभारण्यात आले होते. या ‘ई-बस’ला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत होता; मात्र वरील समस्यांमुळे काही दिवसांमध्येच या बसगाड्या बंद करण्यात आल्या होत्या.