औरंगजेबाच्‍या मजारीवर फुले वहाणे ही वैचारिक दिवाळखोरी आहे ! – मनीष मेश्राम, अध्‍यक्ष, डॉ. आंबेडकर थॉट्‍स असोसिएशन

नागपूर – वंचित बहुजन आघाडीचे अध्‍यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्‍या कबरीला भेट देऊन जयचंदची आठवण करून दिली. हा माणूस कधीही स्‍थिर दिसत नाही.  प्रकाश आंबेडकर कधी नक्षलवाद्यांचे समर्थन करतात, तर कधी इस्‍लामिक कट्टरतावाद्यांविषयी सहानुभूती दाखवतात. त्‍यांनी एम्.आय्.एम्.समवेत युती केली होती. इस्‍लामिक आक्रमणकर्ते आणि औरंगजेब यांनी बुद्ध मूर्ती तोडल्‍या, मंदिरे फोडली, छत्रपती संभाजी महाराजांचा खून केला. औरंगजेबाच्‍या मजारीवर फुले वहाणे ही वैचारिक दिवाळखोरी आहे. मतांसाठी आणखी काय काय करणार आहात ? असा प्रश्‍न ‘डॉ. आंबेडकर थॉट्‍स असोसिएशन’चे अध्‍यक्ष मनीष मेश्राम यांनी उपस्‍थित केला आहे.

बाबासाहेबांची इस्‍लामवर कठोर टीका !

मनीष मेश्राम पुढे म्‍हणाले की, खासदार प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत; पण वारसा हा विचारांचा असतो. इस्‍लामविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कठोर आणि स्‍पष्‍ट टीका टिप्‍पणी केली आहे. निजामाच्‍या विरोधात डॉ. आंबेडकरांनी उघड भूमिका घेतली होती; पण यांच्‍या डोक्‍यात काही प्रकाश पडत नाही. मागील लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांना अकोला आणि सोलापूर येथील मुसलमानांनी मतदान केले नाही, हे स्‍वतः प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्‍यमांना सांगितले होते.