महाराष्ट्रातील ११४ मंदिरांनी मंदिरांचे पावित्र्य आणि संस्कृतीचे रक्षण या महद् उद्देशाने वस्त्रसंहिता लागू करण्याचा स्तुत्य अन् आदर्श निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भडक, अंगप्रदर्शन करणारे तोकडे, पारदर्शक इत्यादी स्वरूपाचे कपडे घालून मंदिरात येणार्यांना चाप बसणार आहे, तसेच मंदिरात शिस्त आणि मंगलमय वातावरण टिकून राहू शकणार आहे. वस्त्रसंहितेची चळवळ मंदिर संस्कृती जपणार्या महाराष्ट्रात चालू होणे आणि तिने वेग पकडणे, ही एका चांगल्या पालटाची नांदी आहे.
आतापर्यंत अमरावती, नागपूर, अहिल्यानगर (नगर), जळगाव, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर इत्यादी जिल्ह्यांमधील मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंदिर विश्वस्तांनी तात्काळ निर्णय घेत तो लागू करण्याची घोषणा केली आहे.
हिंदूंचे अयोग्य वर्तन
हिंदूंची मंदिरे म्हटली, तर तेथे धर्मशिक्षणाचा अभाव असलेले काही हिंदू कसेही आचरण करतात. त्यामध्ये मंदिरात संस्कृतीविहीन वागणे, गप्पा मारणे, मुली-मुले यांनी बागेत फिरत असल्याप्रमाणे फिरणे, तोकडे कपडे घालणे, महिलांनी केस मोकळे सोडून येणे, मंदिरात दर्शनाऐवजी कुटुंबियांसह ‘सेल्फी’ घेण्यात वेळ घालवणे, बाहेरील खाद्यपदार्थ खाणे, कचरा करणे अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. या सर्वांचा परिणाम मंदिराची सात्त्विकता आणि चैतन्य यांवर होतो. हिंदूंच्या काही प्राचीन मंदिरांमध्ये आपल्या पूर्वजांनी मंदिराचे पावित्र्य चांगले आचरण करून आणि इतरांकडून ते करवून घेऊन टिकवून ठेवले आहे; पण आज मात्र वेगळी परिस्थिती आहे.
सर्वत्र गणवेश, मग मंदिरांना का नाही ?
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांचे आचरण धर्मविरोधी होत चालले आहे. काही हिंदू बुद्धीप्रामाण्यवादी झाले आहेत. त्यामुळे त्यांना वस्त्रसंहिता, मंदिरात सात्त्विक आचरण करणे, सात्त्विकता टिकवण्यासाठी प्रयत्न करणे, हे सर्व थोतांड आणि निरर्थक वाटते; मात्र सध्या सरकारी कार्यालये, खासगी आस्थापने, न्यायालय, रुग्णालये, महाविद्यालये येथे कोणते कपडे घालावेत ? आणि कोणते घालू नयेत ? या स्वरूपाच्या काही मार्गदर्शक सूचना आहेत. आता तर केंद्रशासनाने शाळांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’, असे धोरण आणले आहे. त्याच्या कार्यवाहीत महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर हिंदूंच्या मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याच्या निर्णयाचे स्वागतच व्हायला हवे.
अन्य धर्मियांमध्ये पाद्री, आर्चबिशप पायघोळ झगे घालतात. मुसलमान गोल टोपी, सदरा-पायजमा तर घालतातच, तसेच मक्का येथे तर पांढरे वस्त्र घालून प्रदक्षिणा घालतात. हिंदु पुजारीही पारंपरिक धोतर-उपरणे मंदिरात घालतातच. त्यामुळे वस्त्रसंहिता काही नवीन अथवा अतिशय कठीण नियमावली नाही. लग्न किंवा अन्य मोठे सोहळे या वेळी महाराष्ट्रातील स्त्रिया नऊवारी नेसण्याचा अधिक प्रयत्न करतात. त्यासाठी प्रसंगी ‘रेडीमेड’ (तयार) नऊवारी साड्या घालतात, पुरुषही तसे धोतर घालतात. अशा वेळी हौस म्हणून ती वस्त्रे घालण्यात आली, तरी ती संस्कृतीचा एक भाग आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
दांभिक पुरो(अधो)गाम्यांचा विरोध !
वस्त्रसंहितेला कुणाही धर्मप्रेमी हिंदूंनी विरोध केलेला नाही. जो काही विरोध केला, तर तो केवळ पुरो(अधो)गाम्यांनी केला आहे. एकीकडे ‘सर्वत्र समानता हवी’, असे बोलायचे आणि दुसरीकडे मंदिरात वस्त्रसंहिता लागू केली की, गळे काढायचे. एका माध्यमाने तुळजाभवानी मंदिरात वस्त्रसंहितेचा फलक लागल्यावर त्याविरुद्ध जणू मोहीमच चालू केली. या वाहिनीने मंदिरात भेट देणार्या भाविकांचे अभिप्राय जाणून घेतले, तेव्हा १०० टक्के भाविकांनी ‘मंदिरात सभ्य कपडे घालून येण्यानेच लाभ होईल’, असे सांगितले. अन्य ठिकाणी एका महिला भाविकाने सांगितले की, अंगप्रदर्शन करणारे कपडे घालून येणार्यांकडे केवळ पुरुषांचेच नव्हे, तर आम्हा महिलांचेही लक्ष जाते. त्यामुळे नियम हवेतच. वाहिनीला अक्षरश: ‘विरोधात्मक प्रतिक्रिया देणारे कुणीतरी सापडेल का ?’, असे शोधावे लागत होते. एका १० वर्षांच्या मुलाला ‘हाफ पँट’ घालून आल्यामुळे मंदिराच्या सुरक्षारक्षकांनी त्याला अडवले, बस्स ! एवढेच काय ते निमित्त झाले. ‘१० वर्षांचा लहान मुलगा ‘हाफ पँट’ घालून आला, तर काय बिघडले ? मुलांनीही पूर्ण कपडे घालायची बळजोरी कशासाठी ?’, असे त्याच्या पालकांनी विचारलेल्या प्रश्नांचे भांडवल करून वाहिनीने ‘दर्शकांचा गोंधळ होईल आणि वस्त्रसंहितेविषयी चीड येईल’, असे निवेदन केले. साहजिकच काही लोकांचा विरोध झाला असू शकतो आणि त्याच दिवशी तहसीलदारांनी वस्त्रसंहितेचा निर्णय मागे घेतला.
येथेच मंदिरांचे विश्वस्त देवता किंवा देवीचे भक्त असण्याची आवश्यकता लक्षात येते. सरकारी विश्वस्त धर्मज्ञान आणि साधना यांच्या अभावी मंदिरांविषयी कोणताही धार्मिकदृष्ट्या चांगला निर्णय घेऊ शकत नाहीत किंवा घेतला, तरी ते लागू करू शकत नाहीत. त्यासाठी धर्मपालनाने निर्माण होणार्या धर्मबळाचीच आवश्यकता असते. त्यामुळे मंदिरे सरकारी विश्वस्तांकडे सुरक्षित नाहीत, तसेच ते मंदिरांचे पावित्र्य, चैतन्य टिकवून ठेवू शकत नाहीत, हे पुन्हा अधोरेखित होते. म्हणून हिंदूंची मंदिरे सरकारीकरणातून लवकरात लवकर मुक्त करून तेथे धार्मिक वातावरणाची अभिवृद्धी करण्याची नितांत आवश्यकता आहे. वस्त्रसंहिता लागू करून चांगला पायंडा पाडणार्या मंदिरांच्या विश्वस्तांनी आता मंदिरे भक्तांच्या कह्यात येण्यासाठी नियोजनबद्ध पावले उचलायला हवीत. त्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करायला हवा. असे झाल्यास महाराष्ट्रातून देशात वस्त्रसंहितेच्या रूपाने चांगला संदेश जाईल आणि धार्मिक क्षेत्रात पालटाला वेगाने प्रारंभ होईल, हे निश्चित !
महाराष्ट्रातील काही मंदिरांनी लागू केलेली वस्त्रसंहिता देशभरातील अन्य मंदिरांनीही लागू केल्यास धार्मिक उत्थानाच्या चळवळीला वेग येईल ! |