वादळी वार्‍यासह पावसाने दक्षिण गोव्याला झोडपले

अनेक ठिकाणी झाडे आणि घरे कोसळण्याच्या घटना घडल्या; मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही

मडगाव, १ जून (वार्ता.) – गोव्यात ३१ मेच्या रात्री आणि १ जून या दिवशी सकाळी ठिकठिकाणी वादळी वार्‍यासह पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे गोमंतकियांना कडक उन्हाळ्यातून दिलासा मिळाला. १ जून या दिवशी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास चालू झालेला पाऊस सुमारे दीड ते पावणेदोन घंटे कोसळला. या पावसाने मुरगाव आणि सासष्टी तालुक्यांना झोडपून काढले. अनेक ठिकाणी झाडे आणि घरे कोसळण्याच्या घटना घडल्या; मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सुन पावसाचे केरळमध्ये ४ जून, तर गोव्यात ८ जून या दिवशी आगमन होण्याची शक्यता आहे.

१ जून या दिवशी सकाळी मुरगाव आणि सासष्टी तालुक्यांसह बार्देश, फोंडा, आजोशी-मुंडूर, करमळी आदी भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दक्षिण गोव्यात महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतुकीची कोंडी झाली.

Goa Rain Update: कुठे झाड कोसळले तर कुठे घराची पडझड; दक्षिण गोव्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे नुकसान#Goa #Rain #June #Monsoon #southgoa #goanews https://t.co/GOJNOkJyDF

— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) June 1, 2023

मुरगाव तालुक्यात ६ ठिकाणी झाडे कोसळली

मुरगाव तालुक्यात वेळसाव येथे चर्चच्या बाहेर उभ्या असलेल्या चारचाकीवर माड कोसळला, तर ठिकठिकाणी घरांवर झाडे कोसळली. चारचाकीमध्ये एक वृद्ध जोडपे चर्चमध्ये प्रार्थना सभेसाठी आले होते. गाडीवर माड कोसळल्याने जोडपे गाडीत अडकून पडले. त्यातील महिला मारिया फर्नांडिस यांच्या खांद्याला दुखापत झाली. त्यांना उपचारार्थ मडगाव येथील हॉस्पिसियो रुग्णालयात भरती करण्यात आले.

(सौजन्य : Prudent Media Goa) 

मडगाव पालिका इमारतीच्या भोवती पूरस्थिती

मडगाव शहरात ३ घंटे पडलेल्या पावसामुळे मडगाव पालिकेच्या इमारतीच्या भोवती पूरस्थिती निर्माण झाली. पालिका चौकातील काही दुकानांत पाणी गेल्याने व्यापार्‍यांची हानी झाली. पावसामुळे पालिका चौकातील कोहिनूर ऑप्टिशियन्सच्या मालकीचे कोहिनूर हार्डवेअर दुकान, मळिये फार्मसी आणि त्याच चाळीत असलेल्या काही दुकानांत गटारे तुंबून पाणी शिरल्याने दुकानदारांची बरीच हानी झाली. मडगाव येथील एस्.जी.पी.डी.ए. मैदानातील फेस्ताच्या (ख्रिस्त्यांच्या) येथील दुकानांची छप्पर कोसळून हानी झाली. सोनसोडो कचरा यार्डवरील कचरा रस्त्यावर वाहून आल्याने रस्ता निसरडा झाला. धारबांदोडा येथे वादळी वार्‍यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेली गुलमोहरची झाडे मोडून विद्युत् वाहिन्यांवर पडली. यामुळे कालपासून धारबांदोडा परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

गोव्यात ४ आणि ५ जून या दिवशी पावसाची शक्यता

गोव्यात ४ आणि ५ जून या दिवशी मेघगर्जनेसह हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या वेळी ताशी ३० ते ४० कि.मी. वेगाने वारे वहाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरील किनारपट्टी भागात ७५ कि.मी. वेगाने वारे वहाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मासेमारांना समुद्रात न जाण्याची चेतावणी देण्यात आली आहे.