बहादूरखान कोकलताशने देहलीला त्याचा बादशहा औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाची बातमी कळवली. औरंगजेब दरबारात असतांना त्याला ही बातमी समजली. ही बातमी ऐकताच औरंगजेब त्याच्या सिंहासनावरून खाली उतरला आणि त्याच्या जनानखान्यात गेला. तेथे गुडघ्यावर बसून भूमीवर हात आपटू लागला. ‘अल्ला अल्ला’ करून शोक व्यक्त करू लागला. ‘अल्लाने मुसलमानांचे राज्य हिसकावून ते मराठ्यांना दिले. हे फार अती झाले आहे’, अशा शब्दांत तो दु:ख आणि शोक व्यक्त करू लागला. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला’, या बातमीचा औरंगजेबाने इतका धसका घेतला की, तो चक्क २ दिवस अन्नपाणी घेऊ शकला नाही. औरंगजेबाच्या मंत्र्यांनी कशीबशी त्याची समजूत घालून त्याला २ दिवसांनी पुन्हा दरबारात आणून सिंहासनावर बसवले. (येथे एक लक्षात घेणे आवश्यक आहे की, मोगल, आदिलशाही, कुतूबशाही तर सोडाच; पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे दु:ख आणि धसका अगदी साता समुद्रापलीकडे अगदी सीरिया, पर्शिया, इराण, तुर्कस्तान यांनी घेतला होता.
(साभार : ‘शिवाजी हिज लाईफ अँड टाइम्स’ पुस्तकातून, लेखक : गजानन भास्कर मेहंदळे, पृष्ठ क्र. ४९०)
औरंगजेबाच्या २७ वर्षांच्या युद्ध काळात झालेली अपरिमित जीवितहानी
औरंगजेबाचा शासनकाळ एकूण ४८ वर्षांचा होता. त्यापैकी शेवटची २७ वर्षे त्याने स्वतःची राजधानी सोडून दूरवर दक्षिणेत घालवली. २७ वर्षांच्या या युद्धात अपरिमित मनुष्य आणि प्राणी यांची जीवितहानी झाली. रियासतकार ‘निकोलाय मनुची’च्या आधाराने लिहितात की, औरंगजेबाच्या
२७ वर्षांच्या काळात दक्षिणेस लढाईच्या धामधुमीत प्रतिवर्षी त्याच्या बाजूने १ लाख मनुष्य आणि हत्ती, घोडे, उंट, बैल, असे प्राणी मिळून प्रतिवर्षी ३ लाख मरत होते, म्हणजे २७ वर्षांत औरंगजेबाने त्याच्या बाजूची २७ लाख माणसे अन् ८१ लाख जनावरे, म्हणजे १ कोटी ८ लाख एवढ्यांचे जीव गमावले. एवढे उभे करण्यासाठी, त्यांना सांभाळण्यासाठी त्याने किती मोठा खजिना रिक्त केला असेल. याखेरीज या काळात सततच्या लष्करी हालचालीमुळे निर्माण झालेले दुष्काळ आणि नैसर्गिक दुष्काळ, रोगराई यांमुळे झालेली जीवितहानी अन् मराठा, आदिलशाही, कुतूबशाही यांच्याकडील जी काही जीवितहानी झाली असेल, ती तर वेगळीच !
(साभार : ‘इतिहासाच्या पाऊलखुणा’चे फेसबुक)