आज २ जून २०२३ या दिवशी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे. त्या निमित्ताने….
सज्जनांशी सज्जनतेने वागणे आणि दुष्प्रवृत्तींचा नाश करून सुव्यवस्था अन् न्याय प्रस्थापित करणे म्हणजे सहिष्णुता !
छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या चळवळीचा आरंभ केला. समर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवराय यांनी त्यांच्या नंतरच्या पिढ्यांना संस्मरणीय पराक्रम करण्याची स्फूर्ती दिली. ‘परकीय आक्रमकांच्या राजकीय आणि धार्मिक सत्तेपासून स्वतःला मुक्त करणे, परकीय आक्रमकांचे धर्मवेडाने उत्पन्न झालेल्या अभिनेवेशाचे प्रयत्न विफल करणे, हिंदु संस्कृतीला आणि धर्माला सुरक्षित ठेवण्यासाठी हिंदुसाम्राज्याची स्थापना करणे’, हे उद्दिष्ट गाठण्यासाठी तन-मन-धन आणि प्रसंगी सर्वस्वपणाला लावण्याची वृत्ती निर्माण केली. ही वृत्ती हिंदवी स्वराज्यापासून थेट बाजीरावांच्या हिंदुपदपादशाहीपर्यंत आणि नंतरच्या पिढीतील पंतप्रधानांचे बुद्धीमान प्रतिनिधी गोविंदराव काळे यांच्यापर्यंत तेवढीच तेजस्वी राहिली; म्हणूनच गोविंदराव काळे वर्ष १७९५ मध्ये अत्यंत अभिमानाने हिंदवी स्वराज्याचे वर्णन करतांना म्हणाले, ‘‘हे हिंदुस्थान आहे, तुर्कस्तान नाही.’’ हेच हिंदुसाम्राज्याचे जिवंत ध्येय गाठण्यासाठी छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली होती.
१. मराठ्यांच्या युद्धपद्धतीतील वैशिष्ट्य
मराठ्यांची गनिमी काव्याची म्हणजेच वृकयुद्धपद्धती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होती. त्या काळच्या परिस्थितीत ती अत्यंत उपयुक्त होती. छत्रपती शिवरायांच्या नंतरच्या पिढ्यांना सुद्धा ती अत्यंत लवचिक आणि मराठ्यांच्या विशिष्ट सत्तेला अन् बुद्धीला सोयीस्कर असल्याचे आढळून आले. आरंभीच्या काळात छत्रपती शिवरायांनी हेच युद्धतंत्र उपयोगात आणले होते. छत्रपती शिवरायांच्या नंतरच्या काळात मराठ्यांनी मोठ्या प्रमाणात सैन्यदल निर्माण केले. तरीसुद्धा शत्रूविरुद्ध गनिमी काव्याचाच उपयोग केला. शत्रू आपल्यापेक्षा बलवान असेल, तर मराठ्यांचे घोडेस्वार अकस्मात् चारही दिशांना नाहीसे होऊन जात होते. जवळच्या डोंगरावरून किंवा झाडीतून ते टेहळणी करत असत. ‘आपल्याला घाबरून मराठे पळून गेले’, असा समज शत्रूचा होत असे. त्यामुळे शत्रू बेसावध रहात असे. त्याच वेळी अचानक त्याच्यावर छापा घालून आणि त्याला चोप देऊन क्षणात मराठे पळून जात होते. या युद्धतंत्रामुळे शत्रूच्या मनात मराठ्यांविषयी भय निर्माण झाले. ‘ते कुठून येतात ? कसे येतात ?’, हेच शत्रूला कळत नसे.
देश स्वतंत्र करणे आणि देशाचे स्वातंत्र्य राखणे यांसाठी मराठ्यांची युद्धपद्धती समर्थ रामदासस्वामींनी दिलेल्या मौलिक सिद्धांतावर आधारित होती. ते सिद्धांत म्हणजे…
धर्मासाठी मरावे । मरोनी अवघ्यांस मारावे ।
मारिता मारिता घ्यावे । राज्य आपुले ॥
देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्लोळ करावा ।
मुलुख बडवावा वा बुडवावा । धर्म संस्थापनेसाठी ॥
मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा ।
या विशी न करिता तकवा । पूर्वज हासती ॥
शक्तीने मिळती राज्ये । युक्तीने यत्न होत असे ।
सत्कार्यासाठी करावे लागणारे युद्ध पवित्र आहे. असे युद्ध केल्यावाचून स्वातंत्र्य आणि साम्राज्य प्राप्त करता येत नाही. आत्मयज्ञ आणि अमर्याद पराक्रम या दोन गोष्टी युद्धासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. तान्हाजीने सिंहगडावर आत्मयज्ञ आणि पराक्रम या दोन गुणांच्या बळावर जे यश संपादन केले, त्याच गुणांच्या बळावर हिंदवी स्वराज्याची स्थापना होऊ शकली. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे पराक्रमापेक्षा चातुर्याला अधिक महत्त्व आहे. चातुर्यावाचून पराक्रम म्हणजे तो पशूचा गुण होतो. जो आत्मयज्ञ विजयाकडे घेऊन जात नाही, त्याला मराठ्यांच्या युद्धपद्धतीत आणि डावपेचात कोणतेही स्थान नव्हते; म्हणून मराठ्यांनी अशा प्रकारची युद्धनीती उपयोगात आणली होती की, ज्या युद्धामुळे आपली कमीत कमी आणि शत्रूची अधिकाधिक हानी होत असे. याच गुणांनी भविष्यात मराठ्यांना अटकेवर भगवा ध्वज फडकवण्यासाठी बळ प्राप्त झाले. हेच छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या युद्धनीतीचे वैशिष्ट्य आहे.
२. छत्रपती शिवराय सहिष्णु होते का ?
सगळे हिंदू हे सहिष्णुच आहेत. सहिष्णुता हा हिंदूंचा नैसर्गिक गुण आहे. ‘दुसर्यांची मते, भावना, श्रद्धास्थाने यांचा मान राखावा’, असे संस्कार हिंदु संस्कृती करते. ‘सहिष्णु असणे याचा अर्थ अन्याय सहन करणे’, असा होत नाही. त्याचप्रमाणे ‘मी माझ्या श्रद्धास्थानांविषयी श्रद्धा, आदर बाळगायचा नाही’, असाही सहिष्णुतेचा अर्थ होत नाही. ‘आततायी माणसाला सन्मानाने वागवावे’, अशी शिकवण हिंदु संस्कृती देत नाही. सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभाव हे दोन शब्द भिन्न आहेत, तसेच ‘सगळे धर्म सारखीच शिकवण देतात’, हा भ्रम आहे.
‘संस्कृत’ ही हिंदूंची भाषा आहे. ‘देवभाषा’ म्हणून संस्कृत भाषेचा गौरवाने उल्लेख केला जातो. आपली ज्ञानभाषा आणि लोकभाषा संस्कृतच होती. ही सर्व भाषांची जननी आहे. याचा छत्रपती शिवरायांना अभिमान होता; म्हणूनच कृष्ण ज्योतिषी नावाच्या एका विद्वान माणसाने छत्रपती शिवरायांच्या आज्ञेवरून ‘करणकौस्तुभ’ नावाचा एक संस्कृत ग्रंथ लिहिला. छत्रपती शिवरायांची मुद्रा ही संस्कृत भाषेतच होती. राक्षसी दुष्प्रवृत्ती आणि विकृती यांना सहिष्णुतेने वठणीवर आणता येत नाही, हे छत्रपती शिवराय जाणून होते; म्हणून छत्रपती शिवरायांनी सहिष्णुतेला अवाजवी महत्त्व दिले नाही.
‘सहिष्णु असणे याचा अर्थ अन्याय आणि अत्याचार यांच्या विरुद्ध गप्प बसणे’, असा अर्थ होत नाही. ‘सज्जनांशी सज्जनतेने वागणे, दुष्ट आणि दुर्जन दुष्प्रवृत्ती यांचा नाश करून शांतता, सुव्यवस्था अन् न्याय प्रस्थापित करणे म्हणजे सहिष्णुता.’ सहिष्णुतेच्या या व्याख्येला अनुसरून छत्रपती शिवरायांनी स्वतःचा राज्यकारभार केला आणि स्वतःची युद्धनीती आखली.
३. ‘हिंदुस्थानचा पहिला सार्वभौम सत्ताधीश’ म्हणजे छत्रपती शिवराय !
‘छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर सर्वांची सुंता झाली असती’, हे कवी भूषण यांचे वचन आजही आपल्याला छत्रपती शिवरायांचे उद्दिष्ट साध्य झाल्याचे सांगते. ‘हिंदुस्थान हे हिंदु राष्ट्र आहे’, असे घोषित करण्याचा आग्रह आजची हिंदू जनता करते, हे त्याचेच द्योतक आहे. पराभवाची परंपरा नष्ट करून विजयाची परंपरा निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारी ‘जयिष्णु वृत्ती’ हिंदु समाजात निर्माण करणारा मध्ययुगीन ‘हिंदुस्थानचा पहिला सार्वभौम सत्ताधीश’ म्हणून इतिहासाने छत्रपती शिवरायांचे नाव सुवर्णाक्षरात नोंदवले आहे.
यासाठीच शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त छत्रपती शिवराय आणि त्यांचे वीर मावळे यांना मानाचा मुजरा !
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (३०.५.२०२३)