गोसीखुर्द जलाशय (जिल्‍हा भंडारा) येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

गोसीखुर्द जलाशय भंडारा ( संग्रहीत छायाचित्र )

मुंबई – महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळाच्‍या माध्‍यमातून भंडारा जिल्‍ह्यातील गोसीखुर्द जलाशय येथे नैसर्गिक विविधता, मोठी बेटे आणि बंदर यांची उपलब्‍धता आहे. त्‍यामुळे हे जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित करण्‍यात येईल, अशी घोषणा मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

(डावीकडून ) देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे मंगलप्रभात लोढा

राज्‍यातील पर्यटनाला चालना देण्‍यासाठी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली १ जून या दिवशी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्‍या शिखर समितीच्‍या बैठकीत या प्रकल्‍पाला मान्‍यता देण्‍यात आली. या वेळी उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांसह अन्‍य मंत्री उपस्‍थित होते.


पर्यटनस्‍थळांचा दर्जा वाढवतांना पर्यटकांच्‍या सोयीसाठी चांगले रस्‍ते, दळणवळणाची साधने, निवासाची दर्जेदार व्‍यवस्‍था करण्‍याचे निर्देश मुख्‍यमंत्र्यांनी दिले. जलाशयात ४५ कि.मी. जलप्रवास पात्र आहे. सोयीसुविधांमुळे आंतरराष्‍ट्रीय जलपर्यटन विकसित करण्‍यात येणार आहे. नागपूर येथील सोनेगाव तलावाचे सुशोभीकरण, कार्ला लोणावळा येथे चाणक्‍य सेंटर फॉर एक्‍सलन्‍स, मिठबाव येथील गजबादेवी मंदिर सुविधा हे प्रकल्‍प संमत झाले. फडणवीस यांनी गोसीखुर्द जलपर्यटन प्रकल्‍प भंडारा आणि नागपूर या जिल्‍ह्यांच्‍या किनार्‍यावर होत आहे. जानेवारी २०२४ पर्यंत हा प्रकल्‍प पूर्ण करावा, अशी सूचना केली.