१० सहस्रांहून अधिक साधकांच्या उपस्थितीत आणि चैतन्यमय वातावरणात साजरा झालेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा दिव्य ब्रह्मोत्सव !

‘ब्रह्मोत्सव’ सोहळा, जन्मोत्सव आगळा । भावानंदाचा मेळा, साधकांसाठी ।।

फर्मागुडी, फोंडा (गोवा) – श्रीमन्नारायणस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा प्रतिवर्षी साजरा होणारा जन्मोत्सव ही साधकांसाठी अनमोल पर्वणी असते ! प्रतिवर्षी श्रीगुरूंचे जे मनोहारी दर्शन संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून होते, ते भावदर्शन यंदा प्रत्यक्ष घडणार असल्यामुळे साधक डोळ्यांत प्राण आणून गुरुदेवांची वाट पहात होते ! प्रथमच अशा मोठ्या स्वरूपात साजर्‍या होणार्‍या या जन्मोत्सव सोहळ्यात गुरुदेवांचे प्रत्यक्ष दर्शन घडणार, याची साधकांना ओढ वाटत होती. वैशाख मासाचे तप्त वातावरण असले, तरीही श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांच्या कृपाशीर्वादाच्या शीतल छायेच्या ओढीने सर्व जण आतून त्यांना आळवत होते. अशा वेळी सप्तर्षींच्या आज्ञेने श्री गुरूंनी दिव्य रथारूढ श्रीविष्णुरूपात दिलेल्या दर्शनाने साधकमने तृप्त झाली.

सोहळ्याला उपस्थित साधक

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त फर्मागुडी येथील ‘गोवा अभियांत्रिकी महाविद्यालया’च्या मैदानात पार पडलेल्या ‘दिव्य ब्रह्मोत्सवा’त साधकांनी श्री गुरूंची गायन, वादन आणि नृत्य यांद्वारे सेवा केली. श्रीविष्णूरूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे भावदर्शन साधकांना झाले. भावाश्रूंत भिजलेले साधकांचे नयन श्री गुरूंचे रूप हृदयांतरी साठवत कार्यक्रम संपेपर्यंत पुन्हा-पुन्हा त्या भावानंदाची अनुभूती घेत होते. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आदी राज्यांतून आणि भारतभरातून आलेले १० सहस्रांहून अधिक साधक, हिंदुत्वनिष्ठ, अधिवक्ते, हितचिंतक यांनी या भावपर्वणीचा लाभ घेतला. यांसह संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून देश-विदेशांतील ४ सहस्रांहून अधिक साधक आणि जिज्ञासू यांनी ब्रह्मोत्सवाचा लाभ घेतला. रथारूढ भगवान श्रीविष्णूची नृत्य, गायन आणि वादन यांद्वारे स्तुती करणे म्हणजेच ब्रह्मोत्सव ! आंध्रप्रदेश राज्यात सुवर्ण रथात विराजमान असलेल्या तिरुपति बालाजीचा ब्रह्मोत्सव अशा प्रकारे साजरा केला जातो.


सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी महर्षींच्या आज्ञेनुसार विविध देवतांप्रमाणे वेशभूषा करण्याचे कारण

‘मी राम, कृष्ण आणि विष्णु यांची वेशभूषा धारण केल्यावर काही जण माझ्यावर टीका करतात आणि म्हणतात, ‘डॉक्टर स्वतःला राम, कृष्ण आणि विष्णु समजतात !’ त्यांना हे ज्ञात नसते की, केवळ महर्षींचे आज्ञापालन म्हणून मी त्या वेशभूषा धारण करतो. त्यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.

‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्या संदर्भातील शक्ती एकत्र असतात’, असा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार आपण जेव्हा एखाद्या देवतेच्या नावाचा उच्चार करतो, त्या वेळी त्या देवतेचे तत्त्व तेथे काही अंशी कार्यरत होते आणि त्याचा आपल्याला लाभ होतो. याच उद्देशाने मुलांना देवतांची नावे ठेवण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे एखाद्या देवतेप्रमाणे पोशाख परिधान केल्यावरही त्या देवतेच्या तत्त्वाचा लाभ होतो. याच उद्देशाने महर्षींनी मला विविध देवतांची वेशभूषा धारण करण्याची आज्ञा केली.

यामध्ये लक्षात घेण्याचे महत्त्वाचे सूत्र म्हणजे, आध्यात्मिक पातळी कमी असतांना एखाद्याने उच्च देवतेच्या नावाचा जप केल्यास किंवा त्या देवतेची वेशभूषा धारण केल्यास त्याला ती शक्ती सहन न होऊन त्याचा त्रासही होऊ शकतो. संत, उन्नत यांची आज्ञा म्हणून तसे केल्यावर त्यांच्या संकल्पशक्तीमुळे संबंधित देवतेची शक्ती सहन करणे शक्य होते आणि त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१२.५.२०२३)


‘ब्रह्मोत्सवा’साठी मोलाचे सहकार्य केल्याविषयी जाहीर आभार !

  • श्री. सुदिन ढवळीकर, वीजमंत्री, गोवा.
  • श्री. रघुराज फळदेसाई, उपजिल्हाधिकारी, फोंडा.
  • डॉ. कृपाशंकर, प्राचार्य, गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय
  • श्री. संजय म्हार्दाेळकर, कॉन्सेप्ट फॅक्टरी एल्.एल्.पी.
  • वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ, कोल्हापूर
  • पोलीस स्थानक, फोंडा
  • वाहतूक विभाग, गोवा
  • अग्नीशमन विभाग, गोवा

ब्रह्मोत्सवाला उपस्थित मान्यवर

  • श्री. राजन भोबे, गोवा संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
  • श्री. प्रेमानंद कामत, अध्यक्ष, श्री महालसा देवस्थान, म्हार्दाेळ
  • ह.भ.प. सुहासबुवा वझे, संचालक, गोमंतक संत मंडळ
  • श्री. भाई पंडित, अध्यक्ष, गोमंतक मंदिर महासंघ
  • श्री. महेश पारकर, कोकणी साहित्यिक
  • डॉ. राकेश देशमाने, ‘कार्डियाक सर्जन’, मणिपाल रुग्णालय, दोनापावला
  • श्री. रवींद्र प्रभुदेसाई, व्यवस्थापकीय संचालक, ‘पितांबरी’ उद्योग समूह
  • अधिवक्ता कृष्णमूर्ती, कर्नाटक