हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करणे आवश्यक ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे, श्रीमती अनिता बणगे (डावीकडे), श्री. पुरुषोत्तम माळी, श्री. योगेश चौगुले (उजवीकडे) आणि उपस्‍थित भाविक

खडकलाट (जिल्हा बेळगाव) – देशात गुरुकुल शिक्षणपद्धतीत ६४ कला आणि १६ विद्या यांचे शिक्षण हिंदूंना दिले जात होते; परंतु इंग्रजांनी ही गुरुकुल शिक्षण पद्धत नष्ट केली. त्यामुळे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देशात पाहिले, तर हिंदूंना धर्म, संस्कृती, परंपरा, संतांचे महत्त्व काय आहे, हे सांगावे लागत आहे. धर्माविषयी जे प्रेम आहे असे सर्व हिंदु धर्मप्रसारक गावागावात जाऊन आपला धर्म, संस्कृती, परंपरा आणि आपल्या हिंदूंच्या जीवनात साधनेचे काय महत्त्व आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा लाभ घेऊन त्यानुसार हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करणे आवश्यक आहे, तसेच गोमातेच्या रक्षणासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले.

५ मे या दिवशी पौर्णिमेच्या निमित्ताने खडकलाट येथील प.पू. गगनगिरी महाराज यांच्या ध्यानमंदिरात यजमान श्री. डी.जी. कांबळे (मुरगूडकर) यांच्या वतीने होमहवन आणि महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ‘धर्माचरण आणि साधना यांचे महत्त्व’ या विषयावर उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या वेळी प.पू. गगनगिरी महाराज यांचे शिष्य श्री. पुरुषोत्तम माळी, सेवेकरी सर्वश्री राजू मुदगल, अजित लोकरे, संतोष कोळी, शितल खराडे, रंगा बुजरे, श्रीमती अनिता बणगे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री योगेश चौगुले आणि अशोक नाईक यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती. सर्वश्री किरण दुसे, योगेश चौगुले आणि अशोक नाईक यांचा सत्कार श्री. पुरुषोत्तम माळी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक आधुनिक वैद्य विनायक पाटील यांनी केले.

श्री. किरण दुसे म्हणाले की, हिंदु समाजातील पुरुषांनी प्रतिदिन टिळा लावणे आणि स्त्रियांनी कुंकू लावून धर्माचरण केले पाहिजे. वाढदिवसाला केक कापून नव्हे, तर रामरक्षा म्हणून औक्षण करून वाढदिवस साजरा केला पाहिजे. पाश्चिमात्य संस्कृतीचे हिंदूंनी अनुकरण करू नये. हिंदु धर्माच्या परंपरा आणि संस्कृती यांचे महत्त्व भारत देशात अल्प होऊन विदेशात मात्र त्याचे अनुकरण होत आहे. त्यामुळे हिंदूंनी हिंदु धर्माच्या परंपरा आणि संस्कृती यांचे पालन करणे आवश्यक आहे. या वेळी त्यांनी कोणत्या देवतेचा नामजप करायचा ? का करायचा ? पितृपक्षात श्राद्धविधी करण्याचे महत्त्व काय ? दत्ताची उपासना का करायची ? साधकांनी व्यष्टी आणि समष्टी साधना करणे का आवश्यक आहे ? याविषयी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले.