खडकवासला धरणातील प्रदूषण रोखणे आणि चौपाटी परिसरातील गर्दीचे नियोजन करणे यांसाठी संयुक्त पहाणी !

खडकवासला धरण परिसरातील विक्रेते (संग्रहित चित्र)

किरकिटवाडी (पुणे) – लाखो पुणेकरांची तहान भागवणार्‍या खडकवासला धरणाच्या पाण्यात सहस्रो पर्यटक उतरून पाण्याचे प्रदूषण करत असतात, तसेच येथील चौपाटी परिसरात सातत्याने वाहतूक कोंडीही होत असते. हे प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामीण पोलिसांच्या पुढाकाराने पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभागाचे अधिकारी यांनी चौपाटीवरील विक्रेत्यांसह खडकवासला धरण परिसरात संयुक्त पहाणी केली अन् यावर तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. सातत्याने होणारी वाहतूक कोंडी आणि लाखो पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याशी संबंधित असलेला प्रश्न सोडवण्यासाठी ही पहाणी करण्यात आली. या वेळी हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी, पुणे ग्रामीण पोलीस, जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी, हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, खडकवासला धरण शाखा अभियंता, वनपाल, वनरक्षक आणि चौपाटीवरील विक्रेते उपस्थित होते.

करण्यात येणार्‍या उपाययोजना

  • धरण परिसरात पाण्यात उतरण्याच्या वाटा बंद करणार, तसेच पाण्यात उतरणार्‍यांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करणार
  • चौपाटी परिसरात रस्त्याच्या एकाच बाजूने वाहने उभी करण्याचे नियोजन
  • विक्रेत्यांच्या हातगाड्यांसमोर बांबूचे कुंपण करणार
  • वाहने मिळवण्यासाठी डीआयएटीजवळ व्यवस्था करणार