राज्याचे वने आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
सोलापूर, २७ एप्रिल (वार्ता.) – सोलापूर शहरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी शहरातील ५०० एकर वनभूमीवर वनउद्यान उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. मुनगंटीवार यांनी २६ एप्रिल या दिवशी सातरस्ता येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. पंढरपूर येथे संकीर्तन सभागृह उभारण्यात येणार आहे, अशीही माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वेळी दिली. आध्यात्मिक प्रबोधन, कीर्तन हे तृप्त मनाने ऐकता यावे यासाठी या संकीर्तन सभागृहाची योजना आहे. त्यासाठी शासनाने ६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असेही ते म्हणाले.
माळढोक पक्ष्याच्या वाढीसाठी शासन विशेष प्रयत्न करत आहे. या सप्ताहात नागपूर येथे वन विभागाच्या उच्चस्तरीय अधिकार्यांची २ दिवसांची परिषद आयोजित केली असून त्यात अन्य समस्यांवरही सविस्तर चर्चा होणार आहे, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.