आयुक्तांच्या जागीही अद्याप माजी अधिकारीच !
श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई
मुंबई, ४ एप्रिल (वार्ता.) – राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन ९ मास झाले, तरी अद्याप एस्.टी. महामंडळाच्या संकेतस्थळावर परिवहनमंत्र्यांची जागा रिक्त आहे. परिवहनमंत्री हे एस्.टी. महामंडळाचे अध्यक्ष असतात. परिवहन खात्याचा कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हे एस्.टी. महामंडळाचे अध्यक्षही आहेत; मात्र संकेतस्थळावर परिवहनमंत्री, म्हणजेच पर्यायाने महामंडळाच्या अध्यक्षांचेच नाव देण्यात आलेले नाही.
परिवहन आयुक्त म्हणून अद्यापही डॉ. अविनाश ढाकणे यांचेच नाव आहे. डॉ. ढाकणे यांचे स्थानांतर होऊन ३ मास झाले. त्यांच्या जागी परिवहन आयुक्त म्हणून डॉ. विवेक भिवनवार यांची नियुक्ती झाली आहे; मात्र एस्.टी. महामंडळाच्या ‘https://msrtc.maharashtra.gov.in/index.php/node/index/2’ या लिंकवर आवश्यक पालट करण्यात आलेला नाही. महामंहळाचे अध्यक्ष आणि आयुक्त यांची नावेही पालटली गेलेली नाहीत, त्या अर्थी मागील अनेक मास एस्.टी. महामंडळाच्या संकेतस्थळाच्या कामाकडे कुणी ढुंकूनही पहात नसल्याचे दिसून येत आहे.