श्रीक्षेत्र नाणीज येथे जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजन
नाणीज, रत्नागिरी – राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही. राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा विकास करणे, जनतेचे कल्याण करणे, हा खरा राजकारणाचा अर्थ आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नाणीज येथे केले.
श्रीक्षेत्र नाणीज येथे जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या महाविद्यालय इमारतीचे भूमीपूजन ३० मार्च या दिवश मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज, प.पू. कानिफनाथ महाराज, उद्योगमंत्री उदय सामंत, भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार, ज्येष्ठ पत्रकार उल्हास घोसाळकर उपस्थित होते.
मंत्री गडकरी पुढे म्हणाले की,
१. जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराजांचे हे पीठ केवळ धार्मिक कार्य करणारे नाही. सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण अशा सर्वच क्षेत्रांत महाराजांनी कार्य केले आहे.
२. धर्माच रक्षण करण्याचे मोठे काम महाराजांनी केले आहे.
३. गरिबांच्या मुलाला शिक्षण मिळावे यासाठी महाराजांनी संस्थानाच्या माध्यमातून कार्य केले आहे. ज्ञानाचे रूपांतर संपत्तीत करणे या प्रयत्नातून महाराजांनी शिक्षण संकुलाची निर्मिती केली आहे. या ठिकाणाहून भविष्यातील उत्तम नागरिक सिद्ध होतील.
४. महाराजांनी सर्व दृष्टीने समाजाच्या कल्याणाचा मार्ग संस्कारातून, मार्गदर्शनातून, प्रवचनातून सर्वांना दिला आहे.