‘नाईट पार्ट्यां’मुळे अश्वे समुद्रकिनार्‍यावरील कासवांचे अस्तित्व धोक्यात !

‘नाईट पार्टी’चे आयोजन करणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याचे वनमंत्र्यांचे आश्वासन

‘ऑलिव्ह रिडले’ कासवे

पणजी, २७ फेब्रुवारी (वार्ता.) – अश्वे समुद्रकिनार्‍यावर मोठ्या आवाजात वाजवण्यात येणारे संगीत आणि विजेचे झगमगते दिवे यांमुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होण्यासह आता समुद्रकिनार्‍यावर अंडी घालणासाठी येणार्‍या ‘ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या कासवांच्या संख्येत घट झाली आहे. सध्या केवळ ७ कासवे या किनार्‍यावर अंडी घालण्यासाठी येत आहेत.

१. अश्वे, मांद्रे आणि मोरजी येथील समुद्रकिनार्‍यावर ‘ऑलिव्ह रिडले’ कासवे अंडी घालण्यास येतात. सरकारने या जागा ‘कासवांना अंडी घालण्यासाठीच्या जागा’ असल्याचे घोषित केले आहे. यानुसार टेंबावाडा मोरजी येथील समुद्रकिनार्‍यावर ५०० चौरस मीटर भूमी सरकारने ‘कासव संरक्षण क्षेत्र’ म्हणून घोषित केली आहे.


२. वनखात्याच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी आणि मार्च या मासांत येथे कासवे अंडी घालण्यासाठी येत असल्याने हे २ मास महत्त्वाचे असतात; परंतु या समुद्रकिनार्‍यावर मोठ्या आवाजात वाजवण्यात येणारे संगीत आणि विजेचे झगमगते दिवे यामुळे कासवांच्या संख्येवर परिणाम होत आहे.

गेल्या ४५ दिवसांत अश्वे आणि मोरजी येथील समुद्रकिनार्‍यांवर ३५ कासवांनी एकूण २ सहस्र ९०० अंडी घातली आहेत; परंतु अश्वे समुद्रकिनार्‍यावर ज्या ठिकाणी उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून मध्यरात्रीनंतर मोठ्या आवाजात संगीत वाजवूप ‘पार्ट्या’ होतात, त्या ठिकाणी केवळ ७ कासवांनी अंडी घातली आहेत. त्यामुळे अशा पार्ट्यांचे आयोजन करणार्‍यांविरुद्ध सरकार कारवाई करणार कि नाही ? असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

३. वनखात्याने मोरजी येथील ‘उकियो बीच रिसॉर्ट’ या हॉटेलला सी.आर्.झेड्. (किनारपट्टी नियंत्रण क्षेत्र) नियमांचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत संगीत वाजवल्याविषयी, तसेच समुद्रकिनार्‍यावर धातूचे स्टँड उभारल्याविषयी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.

४. ‘रात्रीच्या वेळी पार्ट्यांचे आयोजन करून ध्वनीप्रदूषण करणार्‍यांच्या विरोधात वनखात्याचा कायदा आणि वन्यजीव संरक्षण कायदा यांनुसार कारवाई करण्यात येईल’, असे आश्वासन वनमंत्री विश्वजित राणे यांनी दिले आहे.

विश्वजित राणे

५. याविषयी मांद्रे ध्वनीप्रदूषण समितीचे सदस्य प्रसाद मांद्रेकर म्हणाले, ‘‘समुद्रकिनार्‍यावरील मोठ्या आवाजामुळे अंडी घालण्यासाठी येणार्‍या कासवांवर परिणाम होत आहे. रात्री १० नंतर संगीत वाजवू नये, यासाठी मला आयोजकांवर बळजोरी करावी लागत आहे.’’ (नागरिकांना हे का करावे लागते ? पोलीस आणि प्रशासन या संदर्भात कृती का करत नाहीत ? – संपादक)

 

६. पर्यावरण तज्ञांच्या मते, नियोजन न करता समुद्रकिनार्‍यांवर केल्या जाणार्‍या बांधकामांमुळे शेतीची हानी होणार असून पुरासारख्या दुर्घटना घडू शकतात. (पर्यावरणाला निर्माण झालेले हे धोके रोखण्यासाठी कायद्यांचा कठोर अवलंब आवश्यक ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • ‘पर्यावरणरक्षक’ म्हणून टेंभा मिरवणारे पुरोगामी समुद्रकिनार्‍यावर होणारे ध्वनीप्रदूषण आणि झगमगते दिवे यांमुळे कासवांवर होणार्‍या विपरित परिणामांविषयी गप्प का ?
  • प्रशासनाला कासवांवर परिणाम होत असल्याचे लक्षात येत असल्याने त्यांनी कायद्याचे कठोरपणे पालन करावे, तरच असे प्रकार थांबतील !