राजकारण होत असल्याने विकासाच्या प्रक्रियेला फटका ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

  • आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनास प्रारंभ !

  • मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचे चहापानाचे देयक २ कोटी ३८ लाख रुपये !

अजित पवार

मुंबई, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – विकासकामांमध्ये राजकारण होत असल्याने विकासाच्या प्रक्रियेला फटका बसला आहे. अर्थसंकल्पात मागे संमत केलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे विकासकामे ठप्प पडली आहेत. लाच दिल्याविना लोकांची कामे होत नाहीत. १ मास ३ दिवसांनी आर्थिक वर्ष संपणार आहे. तरीही जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीचे वितरण केलेले नाही. सरकार तिथे लक्ष देण्यास अल्प पडले आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी २६ फेब्रुवारी या दिवशी येथे केला. अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून येथे चालू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अजित पवार पुढे म्हणाले की,

१. गेल्या ८ मासांत सरकारकडून विज्ञापनांवर ५० कोटी रुपये व्यय झाले आहेत. मुंबई महापालिकेकडून १७ कोटी रुपये विज्ञापनांवर व्यय करण्यात आले आहेत.

२. एकीकडे एस्.टी. कर्मचार्‍यांचे वेतन रखडले आहे. पगाराअभावी कर्मचार्‍यांचे कुटुंब उपासमारीचा सामना करत आहे; पण ‘एस्.टी.’ कोट्यवधी रुपये व्यय (खर्च) करून पानभर विज्ञापन देत आहे. मंत्री स्वतःचा टेंभा मिरवत आहेत; मात्र सरकार विज्ञापनांवर वारेमाप व्यय करत आहे.

३. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानावरील ४ मासांचे चहापानाचे देयक २ कोटी ३८ लाख रुपये आले आहे.

४. ओबीसींची जनगणना सरकार का करत नाही ? मराठा, धनगर आणि मुसलमान यांच्या आरक्षणाविषयी सरकार बोलायला सिद्ध नाही. ७५ सहस्र नोकरभरती हा केवळ जुमला आहे.

५. पत्रकार चंद्रकांत वारिशे यांची हत्या, प्रज्ञा सातव यांच्याशी संबंधित प्रकरण, ठाणे मनपा अधिकार्‍याची गुंडगिरी, आदित्य ठाकरे यांच्या फेरीवर आक्रमण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवणे, खासदार संजय राऊत यांना ठार मारण्याची सुपारी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला पोलीस चौकीत मारहाण आणि त्यात त्याचा मृत्यू अशा घटना घडत आहेत. राज्य कोणत्या दिशेने चालले आहे ? राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित आहे का ?

६. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात ५२ सहस्र कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या संमत केल्या होत्या; मात्र तिजोरीचा विचार न करता केवळ मंत्री आणि त्यांच्या आमदारांच्या मतदाररसंघांत कोट्यवधी रुपयांची कामे घोषित करण्यात आली आहेत.

७. विकासकामांऐवजी इतर गोष्टींवर उधळपट्टी चालू आहे. यांचा विचार करून आम्ही चहापानावर बहिष्कार टाकला आहे.