अधिकाधिक वैद्यवनांची निर्मिती होणे आवश्यक ! – प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी

पंचमहाभूत लोकोत्सव ५ वा दिवस – ‘राष्ट्रीय पारंपरिक वैद्य संमेलन’

संमेलनात बोलतांना प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी आणि व्यासपिठावर उपस्थित अन्य मान्यवर

कोल्हापूर – पूर्वीच्या काळी विविध कामांसाठी देववन, ग्रामवन, राजावन आणि वैद्यवन अशा वनांची निर्मिती होत होती. आताच्या काळातही आयुर्वेदिक वनस्पतींच्या निर्माणासाठी अधिकाधिक वैद्यवनांची निर्मिती होणे आवश्यक आहे. प्रत्येक गावात किंवा १० गावांच्या मध्यठिकाणी वैद्यवन निर्माण करण्याची आवश्यकता आहे. गुजरातमध्ये पारंपरिक वैद्यांचे स्वतंत्र विद्यापीठ आहे. त्याप्रमाणे प्रत्येक राज्यात वैद्यांसाठी विद्यापीठ निर्माण व्हायला हवे, असे प्रतिपादन प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी केले.

पंचमहाभूत लोकोत्सवात पाचव्या दिवशी ते ‘राष्ट्रीय पारंपरिक वैद्य संमेलना’त बोलत होते. या वेळी कर्नाटकचे प.पू. शंकरवृद्धा स्वामीजी, बी.व्ही.जी. ग्रूपचे अध्यक्ष एच्.आर्. गायकवाड, कर्नाटक आयुषचे माजी संचालक जी.एन्. श्रीकांथांय्या, पारंपरिक वैद्य परिषदेचे अध्यक्ष जी. महादेवय्या, केरळ येथील वैद्य महासभेचे अध्यक्ष मन्नार जी राधाकृष्णन् वड्यार, वरिष्ठ शास्त्रज्ञ मनीष बोरवालीया यांच्यासह देशभरातील विविध आयुर्वेदिक वैद्य उपस्थित होते.

या वेळी प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले की,

१. एकमेकांच्या ज्ञानाची देवाण-घेवाण व्हावी, विविध उपचार पद्धतींची देवाण-घेवाण व्हावी हा या संमेलनामागील उद्देश आहे.

२. वैद्यांचे संघटन निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध भागांत वैद्यांच्या निर्माणासाठी शिबिरांचे आयोजन करायला हवे. मानवजातीतील ८० टक्के रोग पारंपरिक वैद्य बरे करू शकतात. त्यासाठी मोठ्या रुग्णालयांची आवश्यकता नसते. केवळ २० टक्के रुग्णांसाठीच रुग्णालयाची आवश्यकता आहे. त्यामुळे ग्रामवैद्य असणे आवश्यक आहे.