‘टी.ई.टी.’ अपव्यवहार प्रकरणातील सुपे यांचे ६५ लाखांचे दागिने परत करण्याचे आदेश !

पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा (टी.ई.टी.) अपव्यवहार प्रकरणातील आरोपी राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालिन आयुक्त तुकाराम सुपे यांच्या घरातून जप्त करण्यात आलेले ६५ लाख १३ सहस्र ८०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने सुपे कुटुंबियांना परत करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस्.जे. डोलारे यांनी दिले आहेत.

टी.ई.टी. गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने सुपे यांना १७ डिसेंबर २०२१ या दिवशी अटक केली होती. त्या वेळी त्यांच्या नातेवाईकांकडून २ कोटी ६४ लाख रुपयांची रोकड आणि वरील किमतीचे दागिने जप्त करण्यात आले होते. सुपे कुटुंबियांच्या घरातून जप्त करण्यात आलेले दागिने त्यांच्या मालकीचे, तसेच वापरातील आहेत. हे दागिने सुपे यांची पत्नी, मुलगी, मुलगा, सून आणि जावई यांचे आहेत. पोलीस ठाण्यात पडून राहिले, तर हानी होईल. ‘खटल्याचा निकाल लागेपर्यंत जप्त दागिने आहे तसेच ठेवू’, अशी हमी बंधपत्राद्वारे न्यायालयात दिली जाईल, असा युक्तीवाद सुपे यांच्या अधिवक्त्यांनी केला. त्यावरून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डोलारे यांनी दागिने परत करण्याचा आदेश दिला आहे.