स्वतःच्या इच्छेने विवाह करणे ही गोष्ट आधुनिक नाही, तर रामायण आणि महाभारतापासूनची आहे !

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती !

चंडीगड – ‘स्वयंवर’ म्हणजे ‘स्वतःच्या इच्छेने विवाह करणे’ ही काही आधुनिक गोष्ट नाही. याची मुळे प्राचीन इतिहासामध्ये शोधता येऊ शकतात. यात रामायण, महाभारत यांसाख्या पवित्र ग्रंथांचा समावेश आहे. आपल्या राज्यघटनेने कलम २१ अंतर्गत मानवाधिकाराला मूलभूत स्वतंत्र्याच्या स्वरूपात लागू केले आहे, असे मत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका खटल्यावरील सुनावणीच्या वेळी मांडले. या खटल्यात एका तरुणावर त्याच्या प्रेयसीला पळवून नेऊन तिच्याशी विवाह केल्याचा आरोप करण्यात आला आहे. न्यायालयाने हा आरोप वरील मत मांडत फेटाळून लावला.

उच्च न्यायालयाने म्हटले की, भारतीय संस्कृतीमध्ये विवाह एक करार नाही, तर पवित्र बंधन आहे. विवाह हे केवल विरुद्ध लिंगी व्यक्तींचे भौतिक मिलन नाही, तर समाजातील महत्त्वपूर्ण आणि पवित्र संस्था आहे. येथे २ कुटुंब एक होतात. विवाह न करता जन्माला येणार्‍या अपत्याला विवाहितांना होणार्‍या अपत्यानुसार मान्यता मिळत नाही. यातून विवाहाचे महत्त्व अधिक लक्षात येते. कायद्याचा वापर एखाद्या गुन्हेगाराला दंड देण्यासाठी आहे; मात्र एखाद्या प्रकरणात व्यक्तीने केलेली गोष्ट इतरांना आवडली नाही; म्हणून तिला शिक्षा दिली जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.