जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ भारताच्या दौर्‍यावर !

६ पारंपरिक पाणबुड्या बनवण्याचा करार होणार !

डावीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओलाफ स्कोल्झ

नवी देहली – जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ २ दिवसांच्या भारत दौर्‍यावर राजधानी देहलीमध्ये पोचले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तसेच राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही चान्सलर स्कोल्झ भेट घेणार आहेत. स्फोल्झ यांच्या भेटीमध्ये भारत आणि जर्मनी यांच्यात ६ पारंपरिक पाणबुड्या संयुक्तपणे बांधण्यासाठी करार होणार आहे. स्कोल्झ यांच्यासमवेत वरिष्ठ अधिकारी आणि व्यावसायिक शिष्टमंडळ आहे. २६ फेब्रुवारीला ते बेंगळुरू येथे जाणार आहेत.

या भेटीविषयी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ‘जी-४’चा भाग म्हणून जर्मनी आणि भारत आंतरराष्ट्रीय सूत्रांवर एकत्र काम करतात. जी-४ हा गट  संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी जागांसाठी एकमेकांना पाठिंबा देतो. या गटामध्ये ब्राझिल, जर्मनी, भारत आणि जपान यांचा समावेश आहे. भारत आणि जर्मनी यांमध्ये आर्थिक भागीदारी आहे. जर्मनी हा युरोपियन युनियनमधील भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे. तसेच जर्मनी हा भारताच्या प्रमुख १० जागतिक व्यापारी भागीदारांपैकी एक देश आहे.