समाजातील ढासळती नीतीमत्ता रोखण्यासाठी ‘धर्मशिक्षण आणि धर्माचरण’ हाच उपाय ! – श्रीमती मधुरा तोफखाने, हिंदु जनजागृती समिती

समर्थभक्त माधवराव गाडगीळ मित्र परिवाराच्या वतीने आयोजित ‘महाशिवरात्र कीर्तन महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात पार पडला !

समर्थभक्त माधवराव गाडगीळ मित्र परिवाराच्या वतीने आयोजित ‘महाशिवरात्र कीर्तन महोत्सव’

मिरज (जिल्हा सांगली) – समाजातील ढासळती नीतीमत्ता, दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी, तसेच सर्वच क्षेत्रांत बोकाळलेला भ्रष्टाचार यांवर धर्मशिक्षण आणि धर्माचरण हाच खरा अन् कायमस्वरूपी उपाय आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती मधुरा तोफखाने यांनी केले.

कीर्तन महोत्सवात प्रबोधन करतांना श्रीमती मधुरा तोफखाने

येथील श्री काशी विश्वेश्वर मंदिरात १४ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केलेल्या २१ व्या महाशिवरात्र कीर्तन महोत्सवात त्या ‘धर्मशिक्षण ही काळाची आवश्यकता’ या विषयावर बोलत होत्या. महोत्सवाच्या सांगताप्रसंगी समर्थभक्त माधवराव गाडगीळ यांनी मनोगत व्यक्त केले.

कीर्तन महोत्सवात कीर्तन करतांना ह.भ.प. (कु.) अमृता करंबेळकर

येथील श्री काशी विश्वेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या महाशिवरात्र कीर्तन महोत्सवात १४ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत शिवलीलामृत पारायण, ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप, भजन, प्रवचन, कीर्तनमाला, तसेच आरोग्य शिबिर पार पडले. गोवा येथील ह.भ.प. (कु.) अमृता करंबेळकर या युवा कीर्तनकारांच्या, तसेच मुंबई येथील राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. राजेंद्रबुवा मांडेवाल यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ भाविकांनी घेतला.

‘श्रीराम जय राम जय राम’ नामजप करणार्‍या भाविक

सांगताप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना माधवराव गाडगीळ म्हणाले, ‘‘समर्थ रामदासस्वामी यांनी दिलेला साधना आणि देशभक्ती यांचा वारसा, मित्र, सहकारी आणि कुटुंबीय यांची साथ हेच या महाशिवरात्र कीर्तन महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाचे सार आहे.’’ या प्रसंगी सनातन संस्थेच्या सुरेखा आचार्य, तसेच अन्य यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, भाजपचे नगरसेवक पांडुरंग कोरे, देवस्थानचे अध्यक्ष किशोर पटवर्धन यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

क्षणचित्र

महाशिवरात्र कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने लावण्यात आलेले सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन

महाशिवरात्र कीर्तन महोत्सवाच्या कालावधीत सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्याला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.