‘उष्णतेच्या लाटा – आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन’ विषयी आयआयटी, पवई येथे कार्यशाळा

मुंबई – ‘उष्णतेच्या लाटा – आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन करणे’ या विषयावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी मुंबई), नागपूर येथील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि महाराष्ट्र शासनाचे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमान १३ आणि १४ फेब्रुवारी या दिवशी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यामध्ये देशातील विविध राज्यांतील आणि महाराष्ट्रातील मान्यवर तज्ञ सहभागी होणार आहेत.

जगभरात वातावरणात अनेक पालट होत आहेत. अचानक येणारी वादळे, पाऊस आणि उन्हाळ्यात उष्णतेची लाट वाढत आहेत. गेल्या काही वर्षांपासून भारतात उष्णतेच्या लाटा वाढत आहेत, ज्यामुळे लोकांच्या आरोग्यावर मोठे परिणाम होत आहेत. आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे, तसेच उष्माघातामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता आहे. या विषयाच्या अनुषंगाने या दोन दिवसीय चर्चासत्रांत मार्गदर्शन केले जाणार आहे.

उष्णतेच्या लाटांमध्ये शून्य मृत्यू हे उद्दिष्ट गाठण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने भारतातील अतीउष्णतेच्या लाटेशी संबंधित कार्यक्रमाची कार्यवाही, समन्वय आणि मूल्यमापनासाठी कृती आराखडा सिद्ध करण्यासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्याअनुषंगाने या कार्यशाळेत चर्चा आणि मार्गदर्शन केले जाणार आहे.