अदानी उद्योगसमुहाच्या शेअर्समध्ये ३५ टक्क्यांची घसरण

अदानी उद्योगसमुहाचे प्रमुख गौतम अदानी

नवी देहली – हिंडेनबर्ग आस्थापनाचा अहवाल आल्यापासून अदानी उद्योगसमुहाची वाताहात होतांना दिसत आहे. या अहवालामध्ये या उद्योगसमुहावर  अपव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याचा परिणाम या आस्थापनावर होत आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये ३ फेब्रुवारीला सकाळी ३५ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. यामुळे एका शेअरची किंमत ३ सहस्र ५०० रुपयांवरून १ सहस्र रुपयांवर आली आहे. अशा प्रकारे मागील ९ दिवसांत या समुहाचे शेअर्स ७० टक्क्यांनी घसरले आहेत. या घटनाक्रमानंतर अमेरिकेच्या ‘डाऊ जोंस स्टॉक एक्सचेंज’ने अदानी एंटरप्रायझेसला बाहेर काढले आहे.

अदानी उद्योगसमूह कर्जाची परतफेड करत आहे ! – स्टेट बँक ऑफ इंडिया

अदानी समुहाला स्टेट बँक ऑफ इंडियाने आतापर्यंत २१ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. याविषयी या बँकेचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा म्हणाले की, अदानी समूह कर्जाची परतफेड करत आहे. बँकेने दिलेल्या कर्जाविषयी कोणतीही काळजी करण्याचे कारण आता दिसत नाही.

बांगलादेशकडून अदानी समुहाकडे ऊर्जा संदर्भातील करारामध्ये सुधारणा करण्याची मागणी !

बांगलादेश सरकारने अदानी समुहासमवेतच्या ऊर्जा क्षेत्रातील करारामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे. अदानी समुहाची वीज अत्यंत महागडी आहे. त्यांनी ती स्वस्त केली पाहिजे, असे सरकारचे म्हणणे आहे.

संसदेत हिंडेनबर्गच्या अहवालामुळे दुसर्‍या दिवशीही गदारोळ

हिंडेनबर्गच्या अहवालामुळे संसदेत ३ फेब्रुवारीलाही विरोधी पक्षांकडून गदारोळ करण्यात आला. त्यांनी या अहवालाद्वारे अदानी समुहावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यामुळे मागणीवरून झालेल्या गदारोळामुळे २ फेब्रुवारील संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. ३ फेब्रुवारीलाही दुपारी २ पर्यंत स्थगित करण्यात आले.