काश्मीरमधील आतंकवाद अंतिम टप्प्यात असल्याचे सांगणे, हा वास्तवाचा विपर्यास असल्याचा आरोप !
जम्मू – गेल्या ४ दशकांमध्ये लागोपाठच्या सरकारांनी जम्मू-काश्मीरमधील जिहादी फुटीरतावाद कसा हाताळला ?, याचे आम्ही साक्षीदार आहेत. आजपर्यंत सर्व सरकारे आतंकवादाचा पराभव करण्यात अयशस्वी ठरली आहेत; कारण जम्मू-काश्मीरमध्ये चालू असलेल्या युद्धाचे जिहादी स्वरूप आणि हिंदूंचा नरसंहार यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे धोरण त्यांनी अवलंबले, असा गंभीर आरोप काश्मिरी हिंदूंसाठी कार्यरत असलेल्या ‘पनून कश्मीर’ या संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजय श्रूंगू यांनी येथे एका पत्रकार परिषदेत केला. या वेळी त्यांनी २ जानेवारीला राजौरी येथील धंगरी गावात २ आतंकवादी आक्रमणांत ७ जण ठार झाल्याच्या घटनेचा उल्लेख करत ‘जम्मू-काश्मीरमधील आतंकवादाचा धोका क्षुल्लक ठरवण्याच्या कृतीचे आपण सर्वच साक्षीदार आहोत’ असेही सांगितले.
या वेळी पनून कश्मीरने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,
१. ‘काश्मीरमधील आतंकवाद अंतिम टप्प्यात आहे’, ‘जम्मू जवळपास आतंकवादमुक्त झाला आहे’, तसेच ‘हिंदूंच्या हत्या हे मुसलमानांना अपकीर्त करण्याचे कृत्य आहे’, असे सांगणे, हे जम्मू आणि काश्मीरमधील भीषण वास्तवाचा विपर्यास आहे. जम्मू-कश्मीरमध्ये ‘आतंकवादाचे सामान्यीकरण’ करण्याचे चुकीचे धोरण राबवले जात असून ते बंद न केल्यास भविष्यात आपल्याला गंभीर धोका आहे.
२. आतंकवादाला त्याच्या धार्मिक विचारधारेपासून वेगळे करणे, तसेच आतंकवादाचे धार्मिक स्वरूप न्यून करणे आणि ते नाकारणे, ही आतंकवादाला धर्मनिरपेक्ष ठरवणे चुकीचे आहे.
३. आतंकवादाला सामान्य ठरवण्याच्या सरकारच्या अतीउत्साहामध्ये त्याचे गांभीर्य अल्प करण्यात आले आहे. यामुळेच काश्मीरमधील आतंकवाद वाढतच आहे. ‘प्रतिदिन आतंकवादी मारले जाऊनही सरकारच्या स्वत: च्या स्वीकृतीनुसार आतंकवाद्यांची संख्या वर्षानुवर्षे सारखीच रहात आहे’, हे कसे होऊ शकते ?
४. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडे घेण्यात आलेल्या सुरक्षा आढाव्यात सुरक्षेतील त्रुटी दूर करण्यापेक्षा औपचारिकता पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले.
५. जम्मू आणि काश्मीरमधील आतंकवादाचे सर्वाधिक बळी अल्पसंख्यांक (हिंदू, शीख इ.) आहेत. हिंदूंना काश्मीरमध्ये परत पाठवणे, म्हणजे त्यांना मृत्यूच्या खाईत लोटण्यासारखे आहे. येणारी आपत्ती रोखण्यासाठी हिंदु कर्मचार्यांना काश्मीरमधून जम्मूमध्ये स्थलांतरित करण्याची आवश्यकता आहे.
६. विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत, तसे जम्मू-काश्मीरमधील लोकांवर अधिक आक्रमणे होतील. त्यांना सहज लक्ष्य केले जाईल.
संपादकीय भूमिकाकाश्मिरी हिंदूंच्या संघटनेला जे वाटते त्याकडे सरकारने गांभीर्याने पहावे, असेच देशभरातील हिंदूंना वाटते ! |